नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र - टी. एन. परदेशी - Rayat Samachar

नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र – टी. एन. परदेशी

5 Min Read

साहित्यवार्ता | २.७.२०२४

नाथसंप्रदायातील मंत्र – तंत्र

भूत, प्रेत, पिशाच्च बाधा काढणे, करणी करणे किंवा उलटवणे, बंधनादि क्रिया करून शत्रूंचा ‘बंदोबस्त’ करणे या आणि अशा तांत्रिक विधींचा मार्ग म्हणजे नाथसंप्रदाय अशी बहुतांश लोकांमधे चुकीची परंतु पक्की धारणा आहे. माझे ‘गर्भगिरीतील नाथपंथ’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर मला प्रत्यक्ष व फोनवरून काही लोकांनी या अशा तंत्रमंत्रादि प्रयोगांसाठी गळ घातली. एकतर त्या लोकांनी माझे पुस्तक वाचले नव्हते किंवा वाचले असले तरी त्याचे अंतरंग त्यांना समजले नव्हते. नाथसंप्रदाय म्हटला की लोकांना ‘नवनाथ भक्तिसार’ या पोथी ग्रंथामधे ज्याचा वारंवार उल्लेख येतो व ज्याच्या आधारे भक्तिसार लिहिला आहे असा धुंडीसुत मालू या कवीने दिला आहे तो ‘गोरक्ष किमयागार’ हा ग्रंथ हवा असतो आणि शाबरी मंत्र पाहिजे असतात. जे दुष्प्राप्य त्याची स्वाभाविक ओढ असणे ही सहज प्रवृत्ती असली तरी या दोन्ही गोष्टींमधून लोकांना झटपट सिद्धी अपेक्षित असतात असे दिसते.
सिद्धीसाठी कठोर साधना अपेक्षित असते.

अंतराळात जाणे, यकृत प्रत्यारोपन या आधुनिक सिद्धी आहेत. भागवतादि ग्रंथात वर्णन केलेल्या अणिमा-गरिमा सारख्या सिद्धी प्रत्यक्षात कोणी पाहिल्यात ?अशा दुष्प्राप्य गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी नाथसंप्रदायातील आसन – प्राणायाम – ध्यानाची दैनंदिन साधना करा. त्याने आयुष्यात सकारात्मक बदल निश्चित होतील.
याशिवाय लोकांना चमत्कारांचीही ओढ असते व नाथसंप्रदाय व चमत्कार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू अशीही एक पक्की धारणा जनसामान्यांमधे आहे. अशा रितीने नाथसंप्रदायास मंत्रतंत्राचे, चमत्कारांचे एक वलय प्राप्त झाले आहे.

बद्रीनाथ ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सर्वधर्मीय गुरू, बाबा, महंत व महाराज यांना चमत्कार करून दाखवण्याचे जाहीर आवाहन मागील वर्षी केले आहे !

काही मोठे लेखक व कवी साहित्यिकही या वलयाच्या प्रभावातून सुटलेले नाहीत. मी सन्मानपूर्वक पाठवलेले माझे ‘गर्भगिरीतील नाथपंथ’ हे संशोधनात्मक पुस्तक वाचून पाहण्याचीही तसदी काही सन्माननीयांनी घेतली नाही. एका मोठ्या कलाकाराने तर ते पुस्तक मी उघडूनही न पाहता कोणाला तरी देऊन टाकले असे प्रखर सत्य मला सांगितले होते. पोथी – पुराणांची पुस्तके काय वाचायची असा त्याचा सवाल होता. नाथसंप्रदायाविषयी सार्वत्रिक धारणा काय आहे हे समजावे म्हणून मी काही गोष्टी थोडक्यात सांगितल्या आहेत.

‘नवनाथ भक्तिसार’ या अत्यंत लोकप्रिय ग्रंथातील एका ओवीत “आम्ही विहरतो ज्ञान विज्ञान कारणे” असे मत्स्येंद्रनाथांनी म्हटले आहे. याकडे लोकांचे दुर्लक्ष होत असते. यातील विज्ञान हे भौतिक किंवा तत्सम आधुनिक शास्रांहून भिन्न आहे. गीतेमधील सातवा अध्याय ‘ज्ञानविज्ञान योग’ हा आहे. यातील विज्ञान मत्स्येंद्रनाथांना अपेक्षित आहे. ज्ञान – विज्ञान व प्रज्ञान या ज्ञानाच्या एकाहून एक अशा वरीष्ठ श्रेणी आहेत. नाथसंप्रदाय हा गुरगम्य तर आहेच, गुरू – शिष्य प्रणाली हे त्याचे अधिष्ठान असून ज्ञान व योग ही त्याची उद्दिष्टे आहेत.

नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ निःसंशय पणे लोकप्रिय व श्रेष्ठ ग्रंथ असला तरी याव्यतिरिक्त जेवढे म्हणून नाथवाड़मय आहे ते सारे योग व ज्ञान यांनीच समृद्ध आहे. गोरक्षनाथांच्या लहानमोठ्या ६८ ग्रंथरचना आहेत. त्यातील काही गोरखवाणी या ग्रंथात संकलित केलेल्या आहेत. त्याशिवाय अमनस्क योग, सिद्धसिद्धांत पद्धती, योगबीज, अवधूत गीता या व अशा अनेक ग्रंथांमधून योग – हठयोग व नाथ तत्वज्ञान यांचेच निरूपण केलेले आहे. दत्त-गोरख गुष्टी आणि मच्छिंद्र-गोरख बोध यात अत्त्युच्च अशी तत्वज्ञानात्मक चर्चा आहे.
मग नाथसंप्रदायात तंत्रमंत्र नाहीतच काय ? याचे उत्तर निःसंदिग्धपणे आहेत असेच आहे. गोरक्षनाथांनी नाथसंप्रदायाचे पुनरूज्जीवन करताना तत्कालीन अनेक पंथ व विचारधारांचा समुच्चय साधला. त्यात प्रमुख आहे तो मत्स्येंद्रनाथांचा कौलमार्ग. यातील तत्वज्ञान हे अत्यंत उच्च असे तंत्राधारित तत्वज्ञान आहे. तंत्र – मंत्र व यंत्र हे विशिष्ट साधना मार्ग आहेत. प्राचीन काळापासून उत्तर मध्ययुगीन काळापर्यंत भारतात तंत्र मार्ग विकसित होत राहिला. यात बौद्ध – जैन व हिंदू तंत्राच्या विभिन्न विचारधारा आहेत. तंत्र या एका विषयावर ओशो यांचे पाच खंड प्रसिद्ध आहेत.

नाथसंप्रदायात मंत्र आहेत, यंत्र व तंत्र आहे परंतु त्याचे आकलन केवळ वाचनाने कधीही होणार नाही. हे सारे गुरूगम्य आहे. तज्ञ गुरूंच्या छत्रछायेत राहून व अत्यंत कठोर व्रताचरण- तपाचरण करून किमान बारा वर्षे साधना केली तर प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान होईल. हा वर्षानुवर्षे करावयाच्या साधनेचा मार्ग आहे.

बस थांब्यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी बंगाली बाबांच्या ‘करनी – भूत प्रेत पिशाच – मंत्र तंतर-दुष्मनका बंदोबस्त- मनचाहा प्यार – सौतनसे छुटकारा- लडकीका संमोहन – गॅरंटीका काम…’ अशा जाहिराती लागलेल्या असतात. ही बंगाली ‘विद्या’ व नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र यात महद्अंतर आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे.

– टी.एन.परदेशी,

पुणे, महाराष्ट्र.

Share This Article
Leave a comment