latest news: श्रीरामपूरच्या विकासासाठी पत्रकारांनी पुढे यावे - अविनाश आदिक - Rayat Samachar

latest news: श्रीरामपूरच्या विकासासाठी पत्रकारांनी पुढे यावे – अविनाश आदिक

काँग्रेस भवनात पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
उपसंपादक | दिपक शिरसाठ

सलीमखान पठाण यांनी आदिकसाहेबांच्या आठवणी ताज्या केल्या

श्रीरामपूर | ६ जानेवारी | प्रतिनिधी

(latest news) माजी मंत्री, तालुक्याचे भाग्यविधाते कै. गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर तालुक्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून जिल्ह्याची पायाभरणी करून ठेवलेली आहे. मात्र त्यांच्यानंतर या तालुक्यात आलेल्या नेतृत्वाने तालुक्याच्या विकासासाठी फारसं योगदान दिले नाही. आज श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही, छोट्या जिल्ह्यामध्ये यायला वरिष्ठ अधिकारी तयार नसतात. मात्र श्रीरामपूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून निधी प्राप्त करून घेण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील. पत्रकारांनी तालुक्याच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्याची योग्य मांडणी शासनापुढे करण्यासाठी योगदान द्यावे. सर्व मिळून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सोबत बैठक लावून श्रीरामपूरचे विकासाचे प्रश्न मांडूया. या कामी पत्रकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक यांनी केले.

 

(latest news) येथील काँग्रेस भवनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, कृषक समाज व आदिक परिवारातर्फे पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अविनाश आदिक बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमेशभाऊ कोठारी होते. मंचावर माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, अर्चना पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बोर्डे पाटील, साजिद मिर्झा आदींसह अनेक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

आपल्या प्रमुख भाषणात अविनाश आदिक पुढे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात होणाऱ्या कामासाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीचे श्रेय अनेक लोक घेतात, तेव्हा मला प्रश्न पडतो की, मी जी मंत्र्यांची भेट घेऊन पत्रे दिली आहेत आणि त्यांच्याकडून निधी मंजूर करून घेतला आहे तो कुठे गेला ? श्रेयासाठी मी कधीही काम केले नाही. निधी मिळवून दिला. मात्र अमुक एका ठेकेदाराला काम द्या, असे कधी ही म्हटलेलो नाही. निधी आल्यानंतर दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची तसेच पत्रकारांची आहे.

गोविंदराव आदिक स्वतः पत्रकार व संपादक होते. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. एमआयडीसी, एसटी कार्यशाळा, आरटीओ ऑफिस या मूलभूत सुविधा तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्यामुळे निर्माण झाल्या. परंतु त्यांच्यानंतर या तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केलं असे ते म्हणाले.

माझ्या वडिलांचा वारसा माझी बहीण अनुराधा ही पुढे चालवीत आहे. मी तिला शक्य होईल तेवढी मदत करीत असतो. वडिलांचे आणि तिचे विचार सारखे आहेत. मी मात्र थोडा वेगळ्या विचाराचा आहे असे ते म्हणाले.

 देशभरात मी जिथे जिथे जातो तिथे गोविंदराव आदिकांचा मुलगा म्हणून मला खूप सहकार्य मिळते. आदिक साहेबांबद्दल चरित्रात्मक पुस्तक लिहिण्यासंदर्भात विशाल सह्याद्री ट्रस्टमध्ये चर्चा झाली असून लवकरच ते काम सुरू होईल. त्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी व जुन्या जाणत्या लोकांनी सहकार्य करावे. त्यांच्या बाबतचे साहित्य उपलब्ध करून द्यावे असे ही ते म्हणाले. प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात कार्यकर्ते कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे नूतन उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रीरामपूरसाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन निवडणूक काळात दिलेले आहे. तो निधी मिळवून देण्याचे काम फक्त अविनाश आदिकच करू शकतात असे सांगून त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. तो धागा पकडून अविनाश आदिक आपल्या भाषणात पुढे म्हणाले, अजितदादांनी तीन हजार कोटी रुपये देण्याचा शब्द आपल्याला दिला आहे, मात्र आपण त्यांना साथ दिलेली नाही. तरी सुद्धा आपण त्यांच्याकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू.

तालुक्याचे लोकप्रतिनिधी श्रीरामपूर जिल्ह्याबाबत वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत. मात्र त्यासाठी लागणारे वजन सध्या आपल्याकडे आहे का ? याचा त्यांनी विचार करावा. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्वांनी सोबत प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे ही ते म्हणाले.

यावेळी संपादक करण नवले, बाळासाहेब आगे, पत्रकार शिवाजी पवार, रवी भागवत, पद्माकर शिंपी, विष्णू वाघ, जयेश सावंत, ज्ञानेश गवले आदींनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी यांनी गोविंदराव आदिक यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सांगून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची साध्या पोस्टकार्डवर दखल घेणारे आदिक साहेब हे वेगळे व्यक्तिमत्व होते. ते पत्रकार, संपादक, वकिल सुद्धा होते. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे होते असे सांगितले.

माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी आलेल्या सर्व पत्रकारांचे स्वागत केले. यावेळी आदिक परिवार, कृषक समाजातर्फे सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते व संगीता फासाटे यांनी केले. प्रस्ताविक थोरात यांनी तर जयंत चौधरी यांनी आभार मानले.

याप्रसंगी श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव गाडेकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, मिलिंद कुमार साळवे, भाऊसाहेब काळे, स्वामीराज कुलथे, प्रदीप आहेर, विठ्ठल गोराने,

चंद्रकांत वाकचौरे, दीपक कदम, संतोष बनसोडे, सचिन उघडे यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. रवी भागवत व बाळासाहेब आगे यांच्या टिका टिपणीने कार्यक्रमात रंगत आणली.

काँग्रेस भवनात पार पडलेल्या या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले तसेच शेरोशायरीने रंगत आणली. जय बाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये जोरदार फटकेबाजी करीत उपस्थित त्यांना मनमुराद हसवले तर गोविंदरावजी आदिक हे शेरोशायरीचे चाहते होते असे सांगून त्यांना नेहमी आवडणारा हा शेर –

तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे,

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

मै एक शाम चुरा लू अगर तुम्हे बुरा ना लगे,

तुम्हारे बस मे अगर हो तो भूल जाओ मुझे,

तुम्हे भुलाने मे शायद हमे जमाना लगे.

सांगून सलीमखान पठाण यांनी आदिक साहेबांच्या आठवणी ताज्या केल्या.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment