Social | ‘५५ अल्पवयीन माता’ वृत्तावर खुलासा; अधिकृत नोंदीत असा आकडा नाही

अहिल्यानगरची देशपातळीवर नोंद

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे |३०.५ | रयत समाचार

(Social) अकोले तालुक्यात ५५ अल्पवयीन मुली गरोदर असल्याबाबत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर महिला व बाल विकास विभागाने स्पष्टीकरण देत, संबंधित आकडेवारी विभागाच्या अधिकृत नोंदींवर आधारित नसल्याचे स्पष्ट केले आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविला असून, ‘५५ अल्पवयीन माता’ असल्याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

(Social) महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय तसेच अकोले आणि राजूर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांकडे अशा प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. संबंधित वृत्त हे अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाव्यतेवरील तोंडी चर्चेवर आधारित असून, तथ्य पडताळणीशिवाय ते प्रसिद्ध झाल्याचे विभागाच्या निदर्शनास आले.

(Social) दरम्यान, महिला व बाल विकास विभागाने यापूर्वीच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगासमोर या प्रकरणाची वस्तुस्थिती सादर केली असून, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी आयोगासमोर संपूर्ण माहिती नोंदविली असल्याचे सांगण्यात आले.
बालविवाहाबाबत शासनाची कठोर भूमिका : महाराष्ट्र शासन बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार आणि बालहक्क उल्लंघनाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत असल्याचे विभागाने स्पष्ट केले. अल्पवयीन मुलींचे विवाह किंवा अल्पवयीन माता आढळल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६, सुधारित अधिसूचना २०२२ आणि पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले.
यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामविकास यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, अशा घटना आढळल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे विभागाने सांगितले.
अहिल्यानगरची देशपातळीवर नोंद : ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, केंद्र शासनाच्या पोर्टलवर २.५२ लाखांहून अधिक आणि ‘मेरी सरकार’ पोर्टलवर १५ हजारांहून अधिक ऑनलाइन प्रतिज्ञा नोंदवत जिल्ह्याने राज्यात व देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्ह्यात ४४ हजारांहून अधिक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले असून सुमारे ३९ लाख नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
१५५ बालविवाह रोखण्यात यश : वर्ष २०२५-२६ दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात १५५ बालविवाह रोखण्यात यश आले असून, त्यापैकी १५ प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर ५५ प्रकरणे बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आली आहेत.

 एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांतच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर प्राप्त तक्रारींवर कारवाई करत १०१ संभाव्य बालविवाह रोखण्यात आले असल्याचे विभागाने नमूद केले.

महिला व बाल विकास विभागाने नागरिक आणि माध्यमांना आवाहन करताना, बालकांशी संबंधित संवेदनशील विषयांवर अधिकृत माहिती, तथ्य पडताळणी आणि जबाबदार पत्रकारितेचे तत्त्व पाळण्याचे आवाहन केले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading