पुणे | २६.५ | रयत समाचार
(Cultural Politics) नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे चुकीचे व बदनामीकारक चित्रण करण्यात आल्याचा आरोप करत, संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा हटवणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या चार बहाद्दर मावळ्यांचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कारले या मावळ्यांना ‘शंभूराजेंची मूर्ती’ देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या धाडसी आंदोलनामुळेच आज संभाजी उद्यानात बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा राहू शकला, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
(Cultural Politics) काय होते ते ऐतिहासिक आंदोलन? २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा ब्रॉन्झचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, गडकरींनी आपल्या ‘राजसंन्यास’ नाटकात शंभूराजांना ‘व्यसनी व बदफैली’ दाखवून इतिहास मलिन केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे तब्बल आठ वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर २ जानेवारी २०१७ रोजी पहाटे पाचच्या सुमारास हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कारले या चार तरुणांनी संभाजी उद्यानात प्रवेश केला. त्यांनी गडकरींचा पुतळा हटवून तो थेट शेजारी वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात विसर्जित केला. या घटनेने राज्यभरात मोठी चर्चा निर्माण झाली होती.
(Cultural Politics) त्यांच्या संघर्षामुळेच शंभूराजे आसनस्थ झाले : सोहळ्यात वक्त्यांनी सांगितले, या चार मावळ्यांनी कायदेशीर कारवाईची व अटकेची तमा न बाळगता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी हे धाडस केले. त्यांनी ते पाऊल उचलले नसते, तर आज संभाजी उद्यानात ‘बुधभूषणकार’ राजांचा पुतळा बसवण्याचा ऐतिहासिक मार्ग मोकळा झाला नसता. हा सत्कार त्यांच्या याच ऐतिहासिक धैर्याचा सन्मान आहे.
पुण्यात साजरा झाला ‘आनंदोत्सव’ : ज्या संभाजी उद्यानातून गडकरींचा पुतळा हटवण्यात आला होता, त्याच ठिकाणी आता छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य सभेत या चारही मावळ्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात आणि ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांमध्ये शाही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अनिलबापू भोसले, रवींद्र अण्णा माळवदकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक आणि दीप्तीताई चौधरी यांचाही पुतळा उभारणीतील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, मनोज आखरे, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे नवनाथ घाडगे, विकास पासलकर, मधुकर मेहकरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे संघटक अजय सावंत यांनी केले. तर कार्यक्रमाचे नेटके नियोजन संभाजी ब्रिगेडचे खजिनदार अमोल काटे, जिल्हाध्यक्ष संतोष हगवणे, अनिल माने, वैभव शिंदे, कैलास कणसे, नागराज लावंड, रवी पवार, प्रशांत कुंजीर तसेच मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

