Politics | शक्तीपीठ महामार्गावर ‘माहितीचा अंधार’ : 50 हजार कोटींचा घोटाळा लपवण्यासाठीच माहिती दडवली? राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कोल्हापूर | ५.५ | रयत समाचार

(Politics) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (Maharashtra State Road Development Corporation) गेल्या महिनाभरापासून शक्तीपीठ महामार्गाबाबत माहिती मागवूनही अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.

(Politics) शेट्टी यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर एखाद्या प्रकल्पाची घोषणा करत असतील, तर त्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडे असणे आवश्यक असते. मात्र शक्तीपीठ महामार्गासंदर्भात रस्ते विकास महामंडळाकडे कोणतीही मूलभूत माहिती उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

(Politics) ते पुढे म्हणाले, राज्यातील मोठमोठे प्रकल्प खाजगी कंपन्यांकडे सोपवले जात असून, या कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने कामे सुरू आहेत. प्रशासनातील अनेक प्रामाणिक अधिकारी या कारभारामुळे हतबल झाले असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेपासून दूर जात आहे.
शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अनेक गोष्टी या केवळ ‘काल्पनिक’ असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. विशेष म्हणजे, या तथाकथित तपशीलाबाबत रस्ते विकास महामंडळालाच कोणतीही माहिती नसणे ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेट्टी यांनी आर्थिक मुद्दाही उपस्थित करत म्हटले, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरचा प्रतिकिलोमीटर खर्च सुमारे ५१ कोटी रुपये आहे, तर शक्तीपीठ महामार्गाचा प्रतिकिलोमीटर खर्च तब्बल ११७ कोटी रुपये दाखवला जात आहे. यामध्ये सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा लपवण्यासाठीच माहिती दडवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मागवलेल्या माहितीमध्ये मार्ग कोणत्या जिल्ह्यांतून जाणार, एकूण लांबी, जमीन संपादन, शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला, प्रकल्प खर्च, टोल आकारणी, इंटरचेंजची संख्या, तसेच दुष्काळी भागातील पाणीसाठा यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकहिताच्या एवढ्या मोठ्या प्रकल्पाबाबत माहिती लपवली जाणे म्हणजे शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहे, असे सांगत राजू शेट्टी यांनी तातडीने संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading