पाथर्डी (राजेंद्र देवढे) ८.६.२४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माता-भगिनींविषयी अपशब्द वापरले जात असतील तरी अत्यंत अशोभनीय गोष्ट आहे. सामाजिक तणाव, जातीवाद, वाईट टीकाटिप्पणी योग्य नाही. झाले गेले गंगेला मिळाले, सर्व काही सोडून द्या. सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून स्टेटस ठेवून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन होत असलेल्या टीकेबाबत निषेध व्यक्त करत असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध तालुक्यातील शिरापूर येथील एका व्यक्तीने आक्षेपार्ह लिखाण करत स्टेटस ठेवले. अन्य व्यक्तींकडून वाईट शब्दांमध्ये कमेंट केल्या जात आहेत. त्यावरून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक तणाव वाढला आहे. मुंडे कुटुंबाचा परळीइतकाच प्रभाव पाथर्डीतही असून वंजारी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. शुक्रवारी पाथर्डी बंद ठेवून मुंडे समर्थकांनी सामाजिक एकतेचे मोठे शक्ती प्रदर्शन करत मोर्चा काढला. मुंडे समर्थक आक्रमक कार्यकर्त्यांनी बंद दरम्यान संपूर्ण शहरभर गस्त ठेवली होती. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शुक्रवारीच खासदार निलेश लंके यांचा नागरिक सत्कार प्रताप ढाकणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. होता. पंकजा मुंडे यांच्या बदनामी प्रकरणावरून तालुक्यात झालेले अशांत व संवेदनक्षम वातावरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोक भावनेचा आदर करत खासदार लंके यांची विजयी मिरवणूक रद्द केली. भव्य प्रमाणावर आयोजित सत्कार कार्यक्रम साधेपणाने घेत पंकजा मुंडे यांच्या केल्या गेलेल्या लिखाणाचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने लोक भावना जपत केलेला जाहीर निषेध मुंडे समर्थकांना आपलेपणाचा वाटला. नगर मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदारांचा पराभवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून खासदार निलेश लंके व ॲड. प्रताप ढाकणे यांच्या भाषणातून मुंडे प्रकरणाविरुद्ध झालेला निषेध राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.
यावेळी बोलताना ॲड. ढाकणे म्हणाले, सामाजिक तणाव कुठल्याही परिस्थितीत चांगला नाही. एखाद्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे, अपशब्द वापरणे अत्यंत चुकीचे आहे. जातीय सलोखा बिघडवणारे असे वातावरण तालुक्यात यापूर्वी कधी नव्हते. भावनेच्या भरात केले जाणारे लिखाण अत्यंत वाईट परिणाम करणारे ठरत असून पोलिसांनी अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान खासदार लंके यांनी पाथर्डी दौऱ्यात मुख्य कार्यक्रमानंतर श्री क्षेत्र मोहटादेवी व श्री क्षेत्र भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. लंके यांचा दौरा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.