साहित्यवार्ता | टी.एन.परदेशी
मराठीत लिहिलेली गोरक्षनाथांची अनेक पदे प्रसिध्द आहेत. त्यातील एक महत्वाची कविता अशी आहे –
कैसे बोलों पंडिता देव कौने ठाई,
निज तन निहारता अम्हें तुम्हें नाही.
पाषाणची देवली पाषाणचा देव,
पाषाण पूजिला कैसे फिटीला सनेह.
सजीव तैडिला निरजीव पूजिला,
पापाची करणी कैसे दूतर तिरिला.
तिरथी तिरथी सनान करीला,
बाहर धोये कैसे भीतरि भेदिला.
आदिनाथ नाती मच्छिन्द्रनाथ पूता,
निज तत निहारे गोरष अवधूता.
कविता वरकरणी साधी-सोपी आहे. पाषाणाच्या देवळातील पाषाणाचा देव पूजत बसाल तर मनातील संदेह कसा जाईल? या दगडधोंड्यांच्या पलिकडे जाऊन शोधावे लागेल तेव्हां तो भेटेल व तेव्हाच मनाची निसंदेह अवस्था प्राप्त होईल. सजीवाचे ताडण करून निर्जिवाची पूजा करणे म्हणजे निव्वळ पापाची करणी होय. अशी करणी करून दुस्तर असा भवसागर तरून जाणे कसे शक्य आहे ?
तिर्थी तिर्थी म्हणजे एकामागून एक तीर्थक्षेत्रांवर जाऊन स्नान केल्याने देहाचे केवळ बाह्यरूप धुतले जाईल, त्यामुळे चित्तवृत्तींचा भेद व वेध घेऊन अंतर्मनावरील मळ धुतला जाणे कसे शक्य आहे?
‘तीर्थी धोंडा पाणी’ असे म्हणणाऱ्या तुकारामाच्या वाणीचे मूळ गोरक्षनाथांच्या पदांमधून सापडते!
गोरक्षनाथांची स्मृतीस्थळे संपूर्ण भारतीय द्विपकल्पात पसरलेली आहेत. काबूल, कंदाहार, अफगाणिस्तान, सिंध, पाकीस्तान, लडाख, काश्मीर, तिबेट, नेपाळ, आसामसह भारताच्या प्रत्येक प्रांतापासून श्रीलंकेपर्यंत गोरक्षनाथांचा पाऊलखुणा आढळून येतात. दऱ्याखोऱ्या, अरण्ये, पर्वतशिखरे, तीर्थक्षेत्रे, शहरे, पुरे, नगरे, तांडे, पाडे, गावखेडी अशी सर्वदूर गोरक्षनाथांची ठाणी आहेत. त्यांच्यासारखा असा सर्वदूर फिरलेला संन्यस्त तत्ववेत्ता अन्य कोणीही नाही.
गोरक्षनाथांचे सारे साहित्य हिंदी व संस्कृतमधे आहे. हिंदी भाषेच्या निर्मितीकाळातील प्राथमिक अवस्थेतील अशी गोरक्षनाथांची हिंदी आहे. हिंदी व संस्कृत या दोन भाषांव्यतिरिक्त गोरक्षनाथांनी लिहिले ते फक्त मराठीमधे. अनेक प्रांतांमधून दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या गोरक्षनाथांनी तेथील भाषेतील लिहले नाही, मात्र मराठीत लिहले. यास काही कार्यकारणभाव असेल काय ?
गोरक्षनाथांचे जन्मगाव प्रकटस्थान चंद्रागिरी या नावाचे गाव असल्याचे काही विद्वानांचे मत आहे, मात्र या नावाचे गाव भारतात मिळून येत नाही. हे गाव गोदावरीच्या काठी होते, हा संदर्भ धरून डॉ.रा.चिं.ढेरे यांनी निफाड तालुक्यातील ‘चांदगीर’ हे गाव म्हणजे ‘चंद्रगिरी’ अशी मांडणी केली आहे. गोरक्षनाथांचे मूळ या महाराष्ट्र प्रांतात होते काय?

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
हे हि वाचा : विश्वकोश
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.