Ad imageAd image

World news | संघर्ष नव्हे, संवाद; अविश्वास नव्हे, सहकार्य; संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांचे आवाहन

संस्कृतींमधील संवादाची गरज अधोरेखित

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

न्यूयॉर्क | १०.६ | रयत समाचार

(World news) जगभरात वाढते संघर्ष, विषमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह नव्या तंत्रज्ञानामुळे उभ्या राहणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संवाद आणि परस्पर समजुतीचे महत्त्व अधिक वाढले असल्याचा संदेश संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिला.

(World news) ‘आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन’ (International Day for Dialogue among Civilizations) निमित्त जारी केलेल्या आपल्या संदेशात गुटेरेस यांनी म्हटले की, जग सध्या अस्थिरता आणि परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहेत, आर्थिक व सामाजिक विषमता वाढत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपासून स्वच्छ ऊर्जेपर्यंतची नवी तंत्रज्ञाने मानवजातीसमोर भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न उभी करत आहेत.

(World news) त्यांनी पुढे नमूद केले, अनेकदा सांस्कृतिक, धार्मिक किंवा राष्ट्रीय भिन्नतांचा गैरसमज करून घेतला जातो किंवा त्यांचा वापर जागतिक ऐक्य कमकुवत करण्यासाठी केला जातो. मात्र या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे संवाद होय. ‘राष्ट्रांमधील, संस्कृतींमधील आणि विविध धर्मांमधील संवाद हेच परस्पर सहकार्य आणि विश्वास निर्माण करण्याचे साधन आहे, असे गुटेरेस यांनी स्पष्ट केले.
यावर्षी दुसऱ्यांदा साजरा होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ‘अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन्स’ या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम विविध देश, समाज आणि संस्कृती यांच्यातील दरी कमी करून विविधतेला सामर्थ्यात रूपांतरित करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
गुटेरेस यांनी आपल्या संदेशात असेही म्हटले की, बदलाची सुरुवात खुल्या मनाने आणि खुल्या हृदयाने होते. आज आंतरराष्ट्रीय व्यवस्था कठोर परीक्षेला सामोरी जात असताना संवादामध्ये आपल्याला पुन्हा एकत्र आणण्याची ताकद आहे. अधिक न्याय्य आणि शांततापूर्ण जग निर्माण करण्यासाठी संवाद हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या या संदेशामुळे जागतिक शांतता, सहअस्तित्व आणि सांस्कृतिक सौहार्द यांसाठी संवादाची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading