मुंबई | १४.१२ | रयत समाचार
(World enews) महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम येथे उत्साहात पार पडली. राज्यातील फुटबॉल प्रतिभेचा शोध, संवर्धन आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
(World news) महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आणि सिडको (CIDCO) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारत आहे.
(World news) या ऐतिहासिक कार्यक्रमात जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांची घेतलेली सेल्फी चांगलीच चर्चेत आली. मिसेस मुख्यमंत्री संधीचे सोने करतात अशी फुटबॉलप्रेमींमधे चर्चा आहे.
त्याचबरोबर अर्जेंटीनचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ व रॉड्रिगो डिपॉल, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलचे दिग्गज सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके, MITRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, क्रीडा व पर्यटन क्षेत्रातील मान्यवर, तसेच चित्रपटसृष्टीतील टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनो मोरिया यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
यावेळीमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी सक्षम तयारी करणे, हे ‘प्रोजेक्ट महादेवा’चे मुख्य ध्येय आहे. या उपक्रमातून राज्याला जागतिक दर्जाचे खेळाडू निश्चित मिळतील.
भारताच्या क्रीडा इतिहासातील सुवर्णक्षणांची आठवण करून देत भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाला, प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय कोणताही खेळाडू मोठा होऊ शकत नाही. आज वानखेडेवर उभा असताना मला २०११ च्या विश्वचषकाचा क्षण आठवतो. आजचा दिवसही सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल.
‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत १३ वर्षांखालील मुला-मुलींच्या फुटबॉल प्रतिभेचा संपूर्ण महाराष्ट्रभर शोध घेतला जाणार आहे. निवडलेल्या ६० खेळाडूंना (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, शैक्षणिक पाठबळ आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील तरुण खेळाडूंना जागतिक पातळीवर नेण्यासाठी सुरू झालेला ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा राज्याच्या क्रीडा भविष्याचा नवा पाया ठरणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ‘महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप’ यांनी ‘प्रोजेक्ट महादेवा’ साठी रूपये ९९,९९,०००/- देणगीचा धनादेश तर ‘JSW फाऊंडेशन’च्या वतीने संगीता जिंदल यांनी ‘प्रोजेक्ट महादेवा’ साठी ७५,००,०००/- रूपये देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
