पुणे | १९.२ | रयत समाचार
(World news) इ.स. १८७० च्या दशकात जर्मनीत प्रकाशित झालेल्या एका ज्ञानकोशात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र प्रसिद्ध झाले होते, आणि त्या दुर्मीळ पानाचा अस्सल नमुना इतिहासप्रेमी आशुतोष पाटील यांच्या संग्रही दाखल झाला आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये शिवरायांचे चित्र छापले गेले होते, ही बाबच त्यांच्या वैश्विक कीर्तीची साक्ष देणारी ठरते.

(World news) जर्मनीमध्ये प्रकाशित झालेला ‘Illustrierte Konversations-Lexikon : vergleichendes Nachschlagebuch für den täglichen Gebrauch. Hausschatz für das deutsche Volk und Orbis pictus für die studirende Jugend’ हा बहुखंडी ज्ञानकोश त्या काळातील एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ होता. लिपझिग आणि बर्लिन येथे कार्यरत असलेल्या प्रकाशक फ्रान्झ ओट्टो स्पामर (१८२०–१८८६) यांच्या प्रकाशनसंस्थेतून हा ग्रंथसंच प्रकाशित झाला होता. जर्मन मध्यमवर्गीय कुटुंबे, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ ‘घरगुती ज्ञानकोश’ व ‘चित्रांमधील विश्व’ (Orbis pictus) या संकल्पनेवर आधारित शैक्षणिक साधन म्हणून तयार करण्यात आला होता.
(World news) एकूण आठ मुख्य खंड आणि दोन परिशिष्ट खंड अशा दहा खंडांमध्ये हा संच प्रसिद्ध झाला. त्यातील १८७७ मध्ये प्रकाशित झालेल्या खंडात ‘East India’ या शीर्षकाखाली भारतासंबंधी माहिती देताना अवघ्या दोन-तीन चित्रांचा समावेश करण्यात आला होता. त्यात तंजावरचे मंदिर, मुघलांचे हरम आणि तिसरे म्हणजे ‘Häuptlinge der Mahratten’ (मराठ्यांचा प्रमुख) या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र प्रकाशित करण्यात आले होते. या चित्राला ४३८६ असा क्रमांक देण्यात आला असून ते खंडाच्या ११६३ व्या पानावर आहे.

विशेष म्हणजे हे अस्सल पान आशुतोष पाटील यांच्या संग्रही आले होते; मात्र ते नेमके कोणत्या ग्रंथातील आहे, याचा माग काढण्यासाठी त्यांना दीर्घ काळ शोध घ्यावा लागला. अखेर त्या शोधाला यश आले असून या पानाचा मूळ स्रोत निश्चित झाला आहे. या पानावरील जर्मन भाषेतील मजकूर भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे पाटील यांनी सांगितले असून त्याचे भाषांतर लवकरच उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
युरोपातील १९व्या शतकातील ज्ञानकोशात स्थान मिळालेल्या शिवाजी महाराजांच्या चित्रामुळे त्यांच्या जागतिक प्रभावाला आणखी अधोरेखित करणारे हे दुर्मीळ पान इतिहासप्रेमींसाठी अनमोल ठरत आहे.
