कलावार्ता | ५.५ | रयत समाचार
(World news) मराठी पत्रकारिता आणि व्यंगचित्र परंपरेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी सुरू केलेले साप्ताहिक ‘मार्मिक’ हे केवळ एक व्यंगचित्र सप्ताहिक नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणणारे प्रभावी शस्त्र होते. या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द उर्दू कवी अकबर इलाहाबादी यांचा ‘खिंचों ना कमानों को, न तलवार निकाले, जब तोप मुकाबिल हो, तो अख़बार निकालो’ हा शेर सातत्याने झळकत असे. या ओळींमधून लेखणी आणि व्यंगचित्रांची ताकद स्पष्ट होत असे; शब्द आणि रेषा हीच खरी समाजपरिवर्तनाची शस्त्रे असल्याचा संदेश यातून दिला गेला.
आज ‘जागतिक व्यंगचित्रकार दिन’ साजरा होत असताना, याच परंपरेसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय.
(World news) व्यंगचित्र हे केवळ चित्र नसते, तर ते समाजातील विसंगती, राजकीय परिस्थिती आणि मानवी स्वभावाचे तीक्ष्ण भाष्य असते. भारतात आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ने दशकानुदशके समाजाचे प्रतिबिंब दाखवले. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये केवळ रेषा नव्हत्या, तर अनुभव, निरीक्षण आणि सामाजिक भान होते. जगप्रसिध्द व्यंगचित्रकार नला पोनाप्पा यांची चित्रेही सत्ताधारी यांना धास्ती बसविणारी होती.
(World news) मात्र गेल्या काही वर्षांत एआयचा झपाट्याने झालेला विकास अनेक क्षेत्रांप्रमाणेच कलाक्षेत्रालाही भिडला आहे. काही सेकंदांत ‘परफेक्ट’ व्यंगचित्र तयार करणारी एआय साधने आता सहज उपलब्ध झाली. सोशल मीडियावर ‘लाईक’ आणि ‘व्हायरल’ होणाऱ्या या एआयनिर्मित चित्रांमुळे मानवी कलाकारांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, एआय वेगवान आणि स्वस्त पर्याय देऊ शकते, पण त्यात मानवी संवेदनशीलता, अनुभवातून आलेली खोली आणि सामाजिक संदर्भांची जाण नसते. ‘व्यंगचित्र म्हणजे केवळ हास्य नव्हे, तर ती विचारांची धार आहे’ , असे अनेक ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचे मत आहे.
याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त केली आहे की, जर ही प्रवृत्ती अशीच वाढत राहिली तर नवोदित व्यंगचित्रकारांना संधी मिळणे कठीण होईल. काही ठिकाणी वृत्तसंस्थांनीही एआयचा वापर सुरू केल्याने फ्रीलान्स कलाकारांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
काहीजण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. त्यांच्यामते, एआय हे साधन म्हणून वापरले जाऊ शकते, पण कलाकाराची सर्जनशीलता आणि विचारशक्ती यांना पर्याय नाही. योग्य समतोल साधल्यास तंत्रज्ञान आणि कला यांचे सहअस्तित्व शक्य आहे.
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त हा वाद अधिक तीव्र झाला असला, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ‘व्यंग’ हे मानवी अनुभवातूनच जन्माला येते. एआयवेग देऊ शकते, पण ‘विचार’ निर्माण करण्याची ताकद अजूनही माणसाकडेच आहे. ही सकारात्मक बाब आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
