Education | अभ्यासक्रम वादावर उच्च न्यायालयाचा निर्णय; ‘ते पन्नास दिवस’ कायम, ‘धग’वरही पर्याय खुला

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नागपूर | ५.५ | रयत समाचार

(Education) बी.ए. भाग २ च्या ‘मराठी साहित्य’ अभ्यासक्रमातील कादंबरी बदलावरून निर्माण झालेल्या वादाला अखेर महत्त्वपूर्ण वळण मिळाले असून नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत तोलामोलाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार ‘ते पन्नास दिवस’ ही पवन भगत यांची कादंबरी चालू शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांना ‘ते पन्नास दिवस’ किंवा ‘धग’ या दोन्ही कादंबऱ्यांपैकी कोणत्याही एका कादंबरीवर परीक्षा देण्याचा पर्याय देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

(Education) मराठी अभ्यास मंडळाने बी.ए. भाग २ च्या सत्र ४ साठी ‘विशेष वाङ्मय प्रकार : कादंबरी’ या पत्रिकेत ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचा समावेश केला होता. कोरोनाकाळातील स्थलांतरित कामगारांचे हाल, त्यांच्या संघर्षाचे वास्तव आणि संकटसमयी उभ्या राहिलेल्या माणुसकीचे चित्रण या कादंबरीत प्रभावीपणे मांडले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनदृष्टीचा विस्तार व्हावा हा या निवडीमागील मुख्य उद्देश होता.

(Education) मात्र, कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाचा उल्लेख नसतानाही या कादंबरीत विशिष्ट नेतृत्वावर टीका असल्याचा आरोप काही घटकांनी करत वाद निर्माण केला. ९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सविस्तर चर्चेनंतर हा विषय पुनर्विचारासाठी मराठी अभ्यास मंडळाकडे पाठविण्यात आला.
यानंतर तब्बल तीन महिन्यांनी, ९ मार्च २०२६ रोजी मराठी अभ्यास मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तथापि, २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत पुन्हा चर्चा होऊन बहुमताच्या आधारे २२ विरुद्ध ८ मतांनी ही कादंबरी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याच बैठकीत मराठी अभ्यास मंडळाला पर्यायी कादंबरी सुचवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत ‘धग’ ही कादंबरी पर्याय म्हणून सुचवण्यात आली आणि त्याच दिवशी विद्यापीठाने अधिसूचना काढून अभ्यासक्रमात बदल जाहीर केला.
मात्र, परीक्षेच्या अवघ्या चार आठवडे आधी झालेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. याविरोधात काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.
न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, ४ श्रेयांकांच्या कादंबरीसाठी नियमानुसार १५ आठवड्यांत ६० तास अध्यापन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत हा कालावधी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, या भूमिकेतून न्यायालयाने ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी चालू सत्रासाठी कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
तसेच, विद्यार्थ्यांना ‘ते पन्नास दिवस’ किंवा ‘धग’ या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्या पसंतीनुसार परीक्षा देण्याची मुभा द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले. यासाठी तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश विद्यापीठाला देण्यात आले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अभ्यास मंडळांनी सखोल विचार करून घेतलेले निर्णय विद्यापरिषदेने केवळ बहुमताच्या आधारावर बदलणे दीर्घकालीन दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. सदर प्रकरण हे त्याचे ठळक उदाहरण मानले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेत मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी आणि प्राध्यापकांनी दिलेल्या नैतिक पाठबळाबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading