पुणे | २०.१० | रयत समाचार
(Women) साहित्यिक सेलिब्रिटींच्या गजबजाटात खऱ्या नायिका मात्र नेहमीच पडद्याआड राहतात, असे सांगत प्रकाशिका मोहिनी कारंडे यांनी ‘पृथा’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी आगळी-वेगळी दिशा निवडली. शहरातील हॉटेल्स, सभागृह टाळून त्यांनी थेट खटाव तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या शेतकरी महिलांच्या हस्ते ‘पृथा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन केले.
(Women) या अनोख्या उपक्रमाने ग्रामीण भागात साहित्य आणि स्त्रीशक्तीचा संगम साधला. शेतीलगतचे माळरानच आज ‘मंच’ बनले, भोवतीची हिरवीगार शेती हेच ‘फ्लेक्स डिझाईन’ आणि उभे ठाकलेले डोंगर हेच या कार्यक्रमाचे ‘साक्षीदार’ ठरले.
(Women) ‘पृथा’ अंकात लेखिका कुंदा गुणवंता अशोक यांनी लिहिलेल्या ‘चाड्यावरली मूठ’ या लेखात शेतकरी महिलांच्या संघर्षकथेला शब्द दिले आहेत. याच लेखातील प्रेरणादायी महिला या कार्यक्रमाच्या ‘सेलिब्रिटी’ होत्या. स्वतःच्या श्रमाने, मातीच्या सुगंधाने आणि जिद्दीने सजलेल्या. या उपक्रमाचे नियोजन बाळासाहेब कांबळे यांनी केले असून, उपस्थित सर्व महिला आणि साहित्य रसिकांनी हा दिवस ‘खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाशोत्सव’ असल्याची भावना व्यक्त केली.
नियोजित प्रकाशनात कुणाला अध्यक्ष करायचे आणि कुणाला पाहुणे, याचा विचार करत बसण्यापेक्षा आम्ही थेट त्या नायिकांकडेच गेलो, असे प्रकाशिका मोहिनी कारंडे यांनी सांगितले. हा कार्यक्रम केवळ प्रकाशन नव्हे, तर शेतकरी महिलांच्या परिश्रमाला आणि त्यांच्या कथांना सन्मान देणारा एक साहित्यिक उत्सव ठरला.
