Social | सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; उद्या ता. 13 रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | १२.४ | रयत समाचार

(Social) येथील शासकीय कृषी महाविद्यालयामधील माजी विद्यार्थी संघटनेकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कृषी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’ यंदा निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना जाहीर झाला. हा सन्मान स्वीकारत खोपडे यांनी अत्यंत आनंद व्यक्त करत माजी विद्यार्थी संघटना आदी मान्यवरांचे आभार मानले.

(Social) माजी विद्यार्थी संघटनेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी, ता.१३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता, शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात पार पडणार आहे.

(Social) सोहळ्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्पे यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमात ‘भारताचा आर्थिक विकास व कृषी क्षेत्रातील समस्या’ या विषयावर माजी प्रधान सचिव नानासाहेब पाटील (IAS, निवृत्त) यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. महानंद मांडे हे असतील.
कृषी व समाज क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सुरेश खोपडे यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रमामुळे कृषी क्षेत्रातील विचारमंथनास चालना मिळणार असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना सुरेश खोपडे म्हणाले, माजी विद्यार्थी संघटना, शासकीय कृषी महाविद्यालय पुणे तर्फे जाहीर झालेला ‘कृषी जीवनगौरव पुरस्कार’ स्वीकारताना अत्यंत आनंद होत आहे. माजी विद्यार्थी संघटना आणि सर्व पाहुण्यांचे जाहीर आभार.
Share This Article