नेवासा | रयत समाचार
Social: जात सोडून माणूस म्हणून जगण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ग्रामस्थांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. वारकरी संतांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र आणून आनंदी आणि समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नाच्या दिशेने सौंदाळा गावाने टाकलेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याने सरपंच शरद आरगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव यांनी दिली.
“जात पात धर्म नाही विष्णू दासा” या वारकरी संतांच्या वचनाचा जणू मूर्तिमंत आविष्कार सौंदाळा गावाच्या रूपाने पाहायला मिळत आहे. आज अनेक ठिकाणी जात-धर्माच्या नावाने समाजात दुभंग निर्माण होत असताना माणसाला माणसापासून दूर करणारी जातच सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत क्रांतिकारक असल्याचे मत वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे. ही नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात असून इतर गावांनीही या निर्णयाचा आदर्श घ्यावा, या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव, संविधान समता दिंडीचे संचालक शामसुंदर महाराज सोन्नर, विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा विचार प्रचारक भारत महाराज घोगरे गुरुजी, घेरडीकर वारकरी फडाचे प्रमुख व ‘होय होय वारकरी’ या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्यासह विविध भक्ती संप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जातमुक्त समाज निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या वारकरी संतांच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्या तसेच विवेकवादी आणि समतावादी मूल्ये समाजात रुजविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व संस्था, संघटना व नागरिकांनी या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील यांनी केले आहे.
हे हि वाचा: India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक
Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai