पुणे | ३१ मे | प्रतिनिधी
(Social) कष्टकऱ्यांचे नेते, सत्यशोधक समाजवादी विचारांचे प्रणेते आणि महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन चळवळीचे खंदे नेतृत्व डॉ. बाबा आढाव ता. १ जून रोजी आपले ९५ वे वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्त ३१ मे रोजी एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ‘सत्यशोधक समाजवादी’ या माहितीपटाचे प्रदर्शन आणि ‘लोकशाही समाजवाद – पुढील आव्हाने व दिशा’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

(Social) कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात, माहितीपटाचे लेखक व दिग्दर्शक अमरनाथसिंग यांनी या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचा आणि अनुभवाचा वेध घेतला. यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. डॉ. बाबा आढाव यांनी अमरनाथसिंग आणि चित्रपटाच्या संकल्पनाकार व समन्वयक सुभाष वारे यांचा संविधानाच्या प्रस्ताविकेची फ्रेम आणि गुलाबपुष्प देऊन गौरव केला.

(Social) दुसऱ्या सत्रात चर्चासत्राला महात्मा फुले यांच्या “सत्य सर्वांचे आदिघर” या अखंड वाचनाने सुरुवात झाली, ज्याचे वाचन ज्येष्ठ कार्यकर्त्या काकी पायगुडे यांनी केले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी स्वयं डॉ. बाबा आढाव होते. चर्चासत्राचे प्रास्ताविक सुभाष लोमटे, सचिव, एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांनी केले.

परिसंवादात सुभाष वारे, संजय आवटे (संपादक, लोकमत), डॉ. शमसुद्दीन तांबोळी (अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ) व पत्रकार अश्विनी सातव-डोके यांनी लोकशाही समाजवादासमोरील आव्हानांवर सखोल विचार मांडले.

कार्यक्रमात डॉ. आढाव यांचा तसेच प्रमुख वक्त्यांचा संविधानाच्या प्रस्ताविकेची फ्रेम, शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान ॲड. शारदा वाडेकर, सुरेखा गाडे, सुभाष लोमटे, गोरख मेंगडे, हुसेन पठाण व श्रीपाल ललवाणी यांच्या हस्ते झाला. अध्यक्षीय समारोपात डॉ. आढाव यांनी आपल्या दीर्घ सामाजिक कार्याचा मागोवा घेत समाजवादी विचारांच्या पुढील वाटचालीसाठी नवे संकल्प व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार ओंकार मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन उपेंद्र टण्णू, सहसचिव, एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांनी केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात हमाल पंचायत, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, राष्ट्र सेवा दल, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती व अ.भा. समाजवादी अध्यापक सभा यांसह अनेक संस्थांचा सक्रिय सहभाग होता.
हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक


