अहमदनगर | १३.७ | रयत समाचार
(BLO Honour Ahmednagar) मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी सर्व बीएलओंनी याच समर्पित भावनेने कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
(BLO Honour Ahmednagar) जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदार गणनापत्रकांचे वितरण केले आहे. आतापर्यंत ९५ टक्क्यांहून अधिक गणनापत्रके मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली असून, त्यापैकी ३० टक्क्यांहून अधिक भरलेली गणनापत्रके संकलित करण्यात आली आहेत. संकलित माहितीचे संगणकीकरणही पूर्ण करण्यात आले आहे.
(BLO Honour Ahmednagar) या मोहिमेदरम्यान विविध तालुक्यांतील काही बीएलओंनी विशेष परिश्रम घेत गणनापत्रकांचे शंभर टक्के वितरण, अर्जांचे संकलन आणि संगणकीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांचा गौरव केला.
गौरव प्राप्त करणाऱ्यांमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील संगीता अशोक खेडकर (प्राथमिक शिक्षिका, गोंदर्डी), प्रकाश भाऊसाहेब नेटके (प्राथमिक शिक्षक, जळगाव), अमोल दिनकर उडाणे (प्राथमिक शिक्षक, शिंपोरा), नेवासा मतदारसंघातील श्रीमती सविता नारायण दरंदले (अंगणवाडी सेविका, कण्हेर वस्ती), शेवगाव मतदारसंघातील महेश चंद्रकांत होरणे (प्राथमिक शिक्षक, ढाकणवाडी, ता. पाथर्डी) तसेच अहिल्यानगर मतदारसंघातील रमेश दिगंबर करपे (ग्रामपंचायत कर्मचारी, कौडगाव, ता. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गौरवप्राप्त बीएलओंचे अभिनंदन करताना, जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदारयादीत समाविष्ट व्हावे, यासाठी बीएलओंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ही जबाबदारी संवेदनशीलतेने पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे, श्रीगोंदा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी गौरी सावंत, निवडणूक शाखेच्या तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूरकर, पुनर्वसन तहसीलदार हिमालय घोरपडे, कर्जतचे निवडणूक नायब तहसीलदार योगेश जाधव तसेच निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदारयादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्ह्यात ९५ टक्क्यांहून अधिक गणनापत्रकांचे वितरण पूर्ण झाले असून, शंभर टक्के उद्दिष्टासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. #RayatSamachar #BLO #VoterList #Ahilyanagar #Election
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



