Religion | समता वारीत ‘अभंगबोध’ ग्रंथप्रकाशन सोहळा संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पंढरपूर | ११.५ | रयत समाचार

(Religion) साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रही उपोषण केले होते. या सत्याग्रही उपोषणाची सांगता १० मे १९४७ रोजी झाली. त्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी संतविचार पीठातर्फे पंढरपूरला समता वारीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या समता वारीत ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित अभंगबोध या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

(Religion) या पुस्तकात आठ वारकरी संतांच्या पंचवीस अभंगावर निरुपण केलेले आहे. पुस्तकाचे प्रकाशन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, श्रीसंत कैकाडीबाबा मठाचे अधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव, ह.भ.प. अच्युत महाराज मोफरे आणि विनायक होगाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

(Religion) पुस्तक प्रकाशनानंतर लेखक ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांची सुजित काळंगे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीतून अभंगबोधच्या लिखाणाचा प्रवास उलगडला गेला. डाॅ. श्रीरंग गायकवाड यांनी या पुस्तकावर भाष्य केले. वारकरी संतांच्या अभंगांचे विस्तारपूर्वक चिंतन मनन करुन केलेले हे भाष्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वारकरी संप्रदाय आणि सामाजिक समता या विषयावर चर्चासत्र पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून भाविक आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ अवसाक, निशिकांत प्रचंडराव, सारंग कोळी, ह.भ.प. सौरभ मुधाळे यांनी परिश्रम घेतले.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading