(Religion) वारकरी संप्रदायातील काल्याचा प्रसंग म्हणजे भारतीय संविधानातील समाजवाद या मूल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी पंढरपुरात केले. गोपालकृष्णाने वृंदावनामध्ये गोपाळांना एकत्र बसवून सर्वांच्या शिदोरा एकत्र केल्या आणि काला वाटला. तो काला सर्वांना दिला, सर्व प्रकारचा दिला आणि सारखा दिला हीच शिकवण भारतीय संविधानातील समाजवाद या मूल्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
(Religion) पंढरपूर आषाढी वारीचा समारोप कीर्तनाने होत असतो. पंढरपुरातील प्रसिद्ध कैकाडी महाराज मठात गुरुवारी शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या काल्याचे कीर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी वारकरी संप्रदायातील काल्याचा प्रसंग आणि भारतीय संविधानातील समाजवाद हे मूल्य कसे परस्पर पूरक आहे याची मांडणी केली. त्यासाठी त्यांनी संत साहित्यातील विविध अभंग, ओव्या आणि काल्याच्या प्रसंगाचे दाखले दिले.
(Religion) वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही उपक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या इतर अवताराचे वर्णन न करता गोपाल कृष्णाच्या लीलांचे वर्णन करावे, असा अलिखित नियम आहे. गोपाल कृष्णाने एकंदर तीन नगरामध्ये आपले चरित्र केलेले आहे. गोकुळ, द्वारका आणि मथुरा. परंतु काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं फक्त गोकुळातील चरित्र वर्णन करा असे संत सांगतात,
चरित्र ते उच्चारावे
केले देवे गोकुळी
मग गोकुळातलेच चरित्र का सांगायचे, तर गोकुळामध्ये कृष्णाने समाजकार्य केलेले आहे. मथुरेमध्ये धर्मकारण आणि द्वारकेमध्ये राजकारण केलेले आहे. म्हणून सामाजिक कार्याचा संदेश लोकापर्यंत पोहोचावा यासाठी गोकुळातील चरित्र उच्चारण करावे, असे संत सांगतात, असे शामसुंदर महाराज म्हणाले.
गोकुळातील गोवर्धन पूजा, गोपाळांना त्यांच्या हक्काचे दही, दूध मिळवून देणे आदी सामाजिक उपक्रमांचा ऊहापोह करून शामसुंदर महाराज काल्याच्या प्रसंगाकडे येतात. काल्याच्या प्रसंगांमध्ये भगवंत आपल्यासोबत असलेल्या सर्व गोपाळांच्या शिदोरी एकत्र करतात. कुणाच्या शिदोरीत पुरणपोळी असते, कुणाच्या शिदोरीत श्रीखंड पुरी असते, कुणाच्या शिदोरीत शिळी भाकरी असते. या सगळ्या शिदोऱ्या भगवंत एकत्र करतात आणि मग छोटे गोपाळ पुढे बसवतात. मोठे गोपाळ त्याच्या मागे बसवतात आणि सर्वात मोठे गोपाळ शेवटी बसवतात. शिदोरी वाटताना छोट्या गोपाळापासून सुरुवात करतात. जे दुबळे आहेत, दुर्बल आहेत त्यांना पहिला मिळाले पाहिजे, प्रबळांपेक्षा थोडे अधिक मिळाले पाहीजे, हा भारतीय संविधानातला आरक्षणाचा संकेत या ठिकाणी दिसतो. म्हणून पहिल्यांदा अशक्त गोपाळांना, लहान गोपाळांना काला देतात. पुन्हा त्यापेक्षा मोठ्या गोपाळांना आणि त्यापेक्षा शेवटी सक्षम गोपाळांना काला भगवंत देतात. सर्वांना देतात, सगळे देतात आणि सारखे देतात. यातून एक संकेत दिला जातो की, आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर सर्वांचा सारखा अधिकार आहे. हीच भारतीय संविधानाची भूमिका आहे, असे सांगत शामसुंदर महाराजांनी यावर्षीच्या आषाढी एकादशीपासून ते पुढच्या वर्षीची आषाढी एकादशीपर्यंत शंभर संविधान कीर्तन करण्याच्या केलेल्या संकल्पचा प्रारंभ पंढरपुरात केला.
यावेळी बोलताना कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनीही संतांच्या समतावादी विचारांचा उल्लेख केला. आपण वारकरी आहोत तर कधीही कोणाचा जातीवरून, धर्मावरून द्वेष करू नका. आज तुम्हाला धर्म धर्म म्हणून जे आपसात संघर्ष करण्यास भाग पाडणारे आहेत ते खरे धार्मिक नाहीत. तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असे सांगणारे संत खरे धार्मिक आहेत. आपण संतांनी दाखवलेल्या वाटेवर चालून समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जाधव महाराज यांनी केले.