(Religion) दरवर्षी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’ विशेषांकाचे प्रकाशन होण्याची परंपरा यंदा थांबवण्यात आली असून, मागील तीन वर्षांप्रमाणे यंदाही केवळ मायबाप विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणांवर अंक अर्पण करण्यात आला. ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांच्या उपस्थितीत, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्याध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
(Religion) दरम्यान, मागील दहा वर्षांत ‘रिंगण’चे प्रकाशन महाराष्ट्रातील पाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. यात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ही औपचारिकता थांबवून, केवळ विठ्ठल-रुक्मिणीच्या पवित्र चरणीच अंक अर्पण केला जात आहे.
(Religion) यावर्षी प्रकाशित झालेला ‘रिंगण’ हा संत सेना महाराज विशेषांक असून, काल दुपारी विठ्ठल मंदिरात विधीवत पूजा करून हा विशेषांक विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आला. यानंतर मंदिर समितीचे कार्याध्यक्ष औसेकर महाराज यांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले.
‘रिंगण’ आता लवकरच वाचकांच्या हाती पोहोचणार आहे. अभंगदूत, जाहिरातदार, लेखक यांच्यासाठीचे अंक पोस्टाद्वारे पाठवले जातील. तसेच काही अंक निवडक दुकानांमध्ये देखील ठेवले जाणार आहेत. घरपोच अंक मागविणाऱ्यांसाठी स्वतंत्र सूचना देण्यात येईल.
यावेळी प्रकाशन सोहळ्याच्या वेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात गर्दी असल्यामुळे विठ्ठलासमोरचा फोटो घेता आला नाही. मात्र औसेकर महाराजांसह झालेला प्रकाशनाचा क्षण छायाचित्रात टिपण्यात आल्याची माहिती संपादक परब यांनी दिली. अंक व अधिक माहितीसाठी ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांना ९९८७०३६८०५ | ९४२०६८५१८३ संपर्क साधावा.