(Religion) रामकथावाचक मुरारीबापूंना वाराणसीतील धर्ममार्तंडांकडून करण्यात आलेल्या टीकेने आणि त्यानंतर बापूंना माफी मागण्यास भाग पाडण्यात आल्याने एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहे. ‘खरा हिंदू आज खरोखरच खतरेंमध्ये आहे का?’ असा सवाल उभा राहीला आहे.
(Religion) रामकथा आणि अध्यात्मिक परंपरा यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या मुरारीबापूंनी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी पूर्वनियोजित रामकथेला सुरुवात केली. ही कृती काहींना ‘सुतकात व्यासपीठ अपवित्र केल्यासारखी’ वाटली आणि बापूंवर टीकेचा भडिमार सुरू झाला. विशेषतः सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या अविमुक्तेश्वरानंद यांनी ही संधी साधत मुरारीबापूंवर टीकास्त्र चालवले. परिणामी, बापूंना स्वतःची बाजू स्पष्ट करत असतानाच अखेर माफी मागावी लागली.
(Religion) मुरारीबापूंच्या कथा रामाच्या स्तुतिपाठासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी कधीच राजकीय व्यासपीठाची साथ घेतली नाही, ना शासकीय ताफ्यात सहभागी झाले, ना कोणत्याही राजकीय नेत्याच्या उदात्तीकरणासाठी कथा वापरल्या. रामकथेला त्यांनी सदैव अध्यात्मिक, सर्वसामान्य, आत्मिक दृष्टिकोनातून उंचावलं. त्यांचं भक्तांशी असलेलं नातं हे पवित्र, निष्कलंक आणि विनम्रतेवर आधारित आहे.
परंतु, आज परिस्थिती उलटी आहे. राजकीय संत हे अध्यात्मिक संतांवर भारी पडताना दिसत आहेत. पवित्र कथावाचन, ईश्वरस्मरण आणि आध्यात्मिक उन्नतीच्या प्रक्रियेला आता सामाजिक टोळक्यांच्या अंधश्रद्धा, राजकीय अजेंडा आणि कथित धार्मिक शुद्धतेच्या निकषांवर मोजले जात आहे.
बापूंनी माफी मागण्यामागे ‘शांती प्रियता’ असली तरी ही घटनाच धोक्याची घंटा ठरते. याचा अर्थ असा की, आजच्या काळात योग्य आणि सत्य बाजू मांडूनही आपली निष्ठा आणि श्रद्धा ‘झुंडीच्या’ मर्जीनुसार चालावी लागते.
सुतक ही मानवनिर्मित संकल्पना आहे. गीतेत आत्म्याच्या अमरतेचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला आहे, “नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः…” असे असताना रामकथेसारख्या पारलौकिक गोष्टीस ‘सुतक’ लावणे हे केवळ अज्ञान नव्हे तर अध्यात्माच्या मूळ गाभ्यावरच प्रहार करणे आहे.
आजचा मुख्य प्रश्न असा आहे की, आपण ज्ञानेश्वर माऊलींना आणि त्यांच्या आध्यात्मिक परंपरेला मानतो का, की त्या माऊलींना छळणाऱ्या आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय करणाऱ्या कपटी पंडितांचा धर्म टिकवायचा आहे? शासन व्यवस्थेचा कल जर झुंडशाही आणि अशा पंडित्यांच्या बाजूने असेल, तर मग मुरारीबापूंनी जाहीर माफी मागणं ही त्यांच्या पराभवाची नव्हे, तर हिंदू धर्माच्या सध्याच्या दुःस्थितीची खंतजनक कबुली आहे.
रामकथा ही केवळ वाचनाची गोष्ट नाही, ती संस्कृती आणि सत्व टिकवणारी ऊर्जा आहे. आणि ज्या बापूंनी ती ऊर्जा वर्षानुवर्षे समाजापर्यंत पोचवली, त्यांनाच आज ‘अपवित्रतेचा दोष’ देणे हे खऱ्या धर्माच्या विनाशाचे लक्षण आहे.
हिंदू धर्म हा तर्क, आत्मशोध आणि सहिष्णुतेवर उभा आहे. त्याला जर अंधश्रद्धेच्या, अहंकाराच्या आणि राजकीय सत्ताकांक्षेच्या वावटळीत खेचण्यात आलं, तर ‘हिंदू खरोखर खतरेंमध्ये आहे’ हे विधान केवळ भावनिक शंका राहणार नाही, ती वस्तुस्थिती ठरेल.