मुंबई | २६.५ | रयत समाचार
(Public issue) पेट्रोल, डिझेल आणि गॅस इंधनाच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन अधिकच कठीण बनले असून, या दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने १ जून रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन पुकारण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
(Public issue) माहिती देताना पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी सांगितले की, गेल्या आठ दिवसांत तब्बल चार वेळा इंधन दरवाढ करण्यात आली असून, आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
(Public issue) इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असून, वाहतूक खर्चही प्रचंड वाढला आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे ॲड. लांडे यांनी म्हटले.
या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असून, सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या : पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना स्वस्त दरात खतांचा पुरवठा करावा.
राज्यभर होणाऱ्या या आंदोलनाकडे आता सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व विविध संघटनांचे लक्ष लागले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
