public issue | लोक अडचणीत असताना आमदार, खासदार झोपी गेले आहेत का? माजी आमदार मुरकुटे यांचा सवाल

रयत समाचार वृत्तसेवा
5 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

श्रीरामपूर | ३१ जानेवारी | सलीमखान पठाण

(public issue) गेले तीन-चार दिवस शहरात अतिक्रमणाच्या नावाखाली प्रचंड गोंधळ सुरू आहे. लोक घाबरलेले आहेत. कुणाकडे जावे या द्विधा अवस्थेत आहेत. लोक भयान झाले आहेत. अशा परिस्थितीत आमदार आणि खासदाराचा पत्ता नाही. त्यामुळे लोक अडचणीत असताना आमदार आणि खासदार झोपी गेले आहेत का ? असा प्रश्न माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण मोहिमेबाबत काल दुपारी त्यांनी जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक घेतली व सायंकाळी अशोक बँकेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

(public issue) लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी शहरातील प्रमुख लोक, पत्रकार आदींना सोबत घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारायला पाहिजे होता की, हे काय चालू आहे ? कोणत्या कोर्टाची ऑर्डर आहे ? घाबरलेल्या लोकांना आधार देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित असताना लोकप्रतिनिधी मात्र कुठे दिसत नाही. म्हणून काल दुपारी जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक घेऊन अतिक्रमणग्रस्तांना संपर्क केला. प्रांतांना संपर्क केला. ते म्हणाले आम्ही नोटिसा दिल्या, खुणा केल्या. लोकांचा समज होता की, मागील प्रमाणे सगळं थांबून जाईल पण तसे झाले नाही. शहराची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. लोक सैरभैर पळताहेत. भांबवलेले आहेत परंतु लोकप्रतिनिधी त्यांची जबाबदारी पार पाडीत नाही. त्यांनी माहिती घेऊन लोकांना सांगितले पाहिजे होते. अधिकारी पूर्ण माहिती देत नाही. मुख्याधिकाऱ्यांनी आधी सर्व भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती. आमदार खासदार लक्ष घालतील असे लोकांना वाटत होते. ते त्यांचे काम होते परंतु आज लोकांना आधार देण्यासाठी कोणी नाही. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. मुख्य रस्ता सोडून आतील रस्त्यांवरसुद्धा अतिक्रमणे काढली जात आहेत. त्याबाबत कोणाचे आदेश आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अतिक्रमणाबाबत आपली भूमिका काय ? असे त्यांना विचारले असता मी आता लोकप्रतिनिधी नाही. तरी पण उद्या अधिकाऱ्यांशी बोलून सगळी माहिती घेतो. कारण सध्या काहीच माहिती नाही की काय ‘चालू’ आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत यांनी आधी सर्व माहिती दिली पाहिजे होती. सर्व काही ऐकीव माहितीवर चाललंय. त्यांनी अधिकृतपणे सर्व सांगायला पाहिजे होते. आमदार आणि खासदारांनी अधिकारवाणीने त्यांना विचारले पाहिजे. जाहीर मीटिंग घेतली पाहिजे. सर्व श्रीरामपूर उद्ध्वस्त झालंय आणि हे मात्र कोपऱ्यात मीटिंग घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला.public issue
एकीकडे नगरपालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली असताना आता रेल्वे आणि इरिगेशनची अतिक्रमणेसुद्धा निघणार आहेत अशा अफवा पसरत आहेत. २५ टक्के श्रीरामपूर शहर अतिक्रमणात वसलेले आहे. मुख्य रस्ता कोणता हे निश्चित करून फक्त तेथील अतिक्रमणे काढायची आहेत की शहरातील सर्वच भागातली काढायची आहेत याचा खुलासा प्रशासनाने केला पाहिजे. शहरातील लोक सर्व हातावर पोट भरणारे आहेत. उदरनिर्वाहचे तेवढेच साधन त्यांना आहे परंतु आज सर्वांना वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे. पालकमंत्र्यांनी या सर्व प्रकाराची दखल घेतली पाहिजे होती असे ते म्हणाले.
यावेळी बालिका हायस्कूल समोरील सर्कलमधील दुकानदार त्यांच्याकडे आले होते. त्यांनी सांगितले की या ठिकाणी आम्ही खाजगी जागेत आहोत. नगरपालिकेच्या रस्त्याची जागा सोडून आम्ही आहोत तरीपण आमची दुकाने काढण्यासंदर्भात आम्हाला नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आमच्यावर कर्ज आहे, आमच्या मुलांचे शिक्षण चालू आहे. तीन दिवस झाले जेवण आम्हाला गोड लागत नाही. आमची दुकाने जर उद्ध्वस्त झाली तर आम्ही जगायचे कसे जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्हाला औषध घ्यावे लागेल, असं भावनिक मत एका दुकानदाराने व्यक्त केले. यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांशी आपण उद्या बोलू आणि त्यानंतर आपली भूमिका जाहीर करू असेही मुरकुटे यांनी सांगितले.
१९८० – ८१ साली मी आमदार असताना तत्कालीन जिल्हाधिकारी लखिना यांना भेटून श्रीरामपुरात नगरपालिकेचे गाळे बांधायची सुरुवात केली. मेन रोड, सिंधी मंदिरासमोर तसेच खुले नाट्यगृहासमोर त्या काळात साडेसहा हजार रुपये डिपॉझिट घेऊन आम्ही गाळे बांधले आणि लोकांना गाळे दिले. अतिक्रमण मोहीम राबवताना दंगल नियंत्रक पथक घेऊन मुख्याधिकारी फिरत आहेत. त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. लोकांनी आपला प्रपंच कसा चालवायचा, माणसे उपाशी मरतील, नेमकं कोणत्या ठिकाणची अतिक्रमणे काढणार, दिलेल्या नोटिसा मोघम स्वरूपाच्या आहेत, असे यावेळी दुकानदारांनी सांगितले. बालिका हायस्कूल समोरील अतिक्रमणे काढण्याआधी त्याच रोडवर असलेल्या सोनार गल्ली व धान्य गल्लीतील अतिक्रमणे आधी उठवा असेही हे दुकानदार म्हणाले. यावेळी लोकविकास आघाडीचे अध्यक्ष नाना पाटील व प्रवीण फरगडे हे देखील उपस्थित होते.
माजी आमदाराच्या अतिक्रमणाला अभय
संगमनेर रोडवरील अतिक्रमाने मुख्य रस्त्यापासून ५० फुटापर्यंत काढत असताना पेट्रोल पंपाजवळ असलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे कार्यालय मात्र अबाधित आहे. त्याला नगरपालिकेने हात लावला नाही अशी तक्रार यावेळी लोकांनी केली.

हे ही वाचा : history | खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading