Politics | रा.स्व.संघ भाजपाची ‘नवी खेळी’ ? महापौरपदाच्या ‘रोटेशन’ला ब्रेक ? ओबीसी संघटनांचा संताप

अहिल्यानगर महानगरपालिका महापौरपद वाद

SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ५.२ | रयत समाचार

(Politics) अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवरून राज्यभर ओबीसी संघटनांचा संताप उफाळला आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या या पदावर रोटेशन पद्धतीची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप करत संघटनांनी भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

(Politics) रोटेशन पद्धत डावलल्याचा आरोप : पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी जनमोर्चा आणि स्थानिक ओबीसी हक्क संरक्षण समितीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुणबी घटकातील ज्योती गाडे यांची युतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की, रोटेशननुसार ज्या उपजातींना संधी मिळायला हवी होती, त्यांना डावलून विशिष्ट राजकीय सोयीसाठी नियमांची पायमल्ली केली जात आहे.

(Politics) व्यक्तीविरोधात नाही, तर नियमांचे उल्लंघन : ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केले की, हा आक्षेप कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून, ओबीसी उपजातींना रोटेशननुसार मिळणाऱ्या संधींचे उल्लंघन होत असल्याबाबत आहे. “प्रस्थापित राजकीय पक्ष ओबीसी आरक्षणाचा वापर केवळ सत्तेसाठी करत आहेत; प्रत्यक्षात ओबीसी प्रतिनिधींना निर्णयप्रक्रियेत स्थान दिले जात नाही,” असा गंभीर आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
आंदोलन आणि न्यायालयाची धमकी : याचिकाकर्ते मंगेश ससाणे, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, ओबीसी अभ्यासक प्रा. श्रावण देवरे, दशरथ राऊत, बाळासाहेब कर्डिले यांनी संयुक्तपणे मागणी केली की, या प्रक्रियेला स्थगिती द्यावी किंवा तातडीने फेरविचार करावा. निवडणूक आयोगाने हरकतीची दखल न घेतल्यास अहिल्यानगरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला.
राज्यभरातील रोटेशनचा प्रश्न : नेत्यांनी केवळ अहिल्यानगरच नव्हे, तर राज्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारे रोटेशन डावलले जात असल्याच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. प्रकरणावर निवडणूक आयोगाची भूमिका आणि पुढील कायदेशीर हालचालींवर राज्याचे लक्ष आता केंद्रित झाले आहे.
ओबीसी नगरसेवकांची मौन भूमिका : दरम्यान, ओबीसी नेत्या-कार्यकर्त्यांनी मनपा निवडणूक काळातील भाजपा-राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले आहे. त्यांचे सक्रिय लोकप्रतिनिधी व नगरसेवक या काळात मराठा नेत्यांच्या मागेमागे फिरत असल्याचे दिसून येते. ते ओबीसींसाठी काहीच भूमिका घेत नाहीत.
वेळ आली तर ओबीसीसाठी त्यांनी विखे-जगताप या मराठा नेत्यांमागे न फिरता स्वतंत्रपणे निर्णायक भूमिका घेतली पाहिजे, अशी चर्चा ओरिजनल ओबीसींमधे असल्याचे कळते. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचे घेणारे वळण महत्त्वाचे ठरणार आहे.
रा.स्व.संघ भाजपाची नवी खेळी : दरम्यान, काही दिवसांपूर्वी रा.स्व. संघ भाजपाचे नेते ॲड. अभय आगरकर यांनी ओरिजनल ओबीसीला महापौरपद द्यावे, असे पत्रक काढून मागणी केली होती, तरीही विखे-जगताप यांनी ही मागणी कोलून लावल्याने रा.स्व.संघाचे ‘वरचे’ ‘चाणक्य’ ऍक्टिव्ह होऊन ‘नवी खेळी’ सुरू केल्याची चर्चा ओरिजनल ओबीसींमधे सुरू आहे.

 

Share This Article