अहमदनगर | २५.११ | रयत समाचार
(Politics) गर्भपिशवीच्या कॅन्सरपेक्षा महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत असून हा आजार २० ते ९० वयोगटातील कोणत्याही महिलेला होऊ शकतो, असे प्रतिपादन मॅककेअर हॉस्पिटलच्या डॉ. सुप्रिया काशीद यांनी केले. माजी नगरसेविका मनिषा बारस्कर–काळे यांच्या पुढाकारातून शिंदे मळा येथे आयोजित महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या.
(Politics) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मॅककेअर हॉस्पिटल आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व ह.भ.प. अभय महाराज केजकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संत नामदेव महाराज ट्रस्टचे दिलीप काकडे, राजू पाटकुले, विठ्ठलराव वनारसे, भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड, सावेडी मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
(Politics) डॉ. काशीद पुढे म्हणाल्या, स्तनाचा कॅन्सर हा कौटुंबिक इतिहासामुळेच होतो ही समजूत चुकीची आहे. ८०% रुग्णांमध्ये हा आजार नव्याने आढळतो, तर फक्त २०% रुग्णांमध्ये तो अनुवांशिक असतो. युवतींच्या आरोग्याकडे आईने विशेष लक्ष दिल्यास आणि गाठ लवकर ओळखल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.
यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, आपल्या बहिणी, माता आणि मुलींच्या आरोग्यासाठी मनिषाताईंनी आयोजित केलेला हा उपक्रम प्रशंसनीय आहे. अशा शिबिरांद्वारे महिलांनी आपल्या मैत्रिणी, नातेवाईक यांचेही समुपदेशन करावे, असे आवाहन त्यांनी केले. ह.भ.प. अभय महाराज केजकर यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
शिबिरात एकूण १५५ महिलांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली. उच्च रक्तदाब, मधुमेह, ईसीजी तसेच स्तन कॅन्सर तपासणीसाठी मॅमोग्राफी या सर्व तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या.
सचिन काकडे, सोमनाथ पाटकुले, अशोक वाकळे, राजेंद्र उल्हारे, ओम उल्हारे यांच्यासह शिंदे मळा व धर्माधिकारी मळ्यातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
