मुंबई | २७ जुलै | प्रतिनिधी
(Politics) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट ‘मातोश्री’वर जाऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीने केवळ सौजन्य भेट म्हणून न पाहता, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
(Politics) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गुलाबांच्या फुलांचा भव्य गुलदस्ता देत शुभेच्छा दिल्या. यानंतर दोघांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभे राहून एकत्र छायाचित्रही काढले.
(Politics) गेल्या काही दिवसांत मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिका, विशेषतः मराठी भाषा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेल्या मेळाव्यांमध्ये राज ठाकरे यांची जळजळीत भाषणे, तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यांवरील परखड भूमिका लक्षवेधी ठरली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची ही ‘मातोश्री’ भेट आणखी महत्त्वाची ठरते.
राजकीय निरीक्षकांच्या मते, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांमध्ये भविष्यात एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावता येत नाही. विशेषतः दोन्ही पक्षांचे मूळ प्रबोधनकार के.सी. ठाकरे आणि बाळासाहेबांच्या विचारांशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे या भेटीला केवळ वैयक्तिक सौजन्य भेट म्हणून न पाहता, भविष्यातील संभाव्य एकत्रिकरणाच्या दिशेने पडणारे एक पाऊल असेही मानले जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध उपक्रम राबवले गेले. तर राज ठाकरे यांच्या या भेटीने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्सुकतेचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
मराठी अस्मिता, हिंदुत्वाचा मुद्दा आणि प्रबोधनकार आणि बाळासाहेबांचे विचार या सूत्रांवर आधारित शिवसेना-मनसे पुन्हा एकत्र येतील का, हे येणारा काळच ठरवेल. मात्र ‘मातोश्री’वरील ही भेट त्या दिशेने सुरूवात असू शकते, अशी राजकीय चर्चा सध्या रंगली आहे.

