कर्जत | ०५.१२ | रयत समाचार
अतिवृष्टीमुळे सीनानदीवरील अनेक बंधारे फुटून, गेट्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भराव वाहून गेल्याने या परिसरात पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर झाली. या दुरावस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पालकमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
अधिक माहिती देताना आमदार पवार म्हणाले, प्रत्यक्षात केवळ नाद मिटवण्यापुरतं काम सुरू असल्याचं चित्र पहायला मिळतं. निमगाव डाकू आणि चोंडी येथील बंधाऱ्यांवर दुरुस्ती सुरु असताना अचानक कामे थांबवून संपूर्ण यंत्रणाच जलसंपदा विभागाने मागे घेतली.
याशिवाय जवळा येथील बंधाऱ्याचे काम अमावास्या पौर्णिमेलाच सुरु होते, तर निमगाव गांगर्डा येथील दुरुस्ती अद्यापही सुरू न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मलठण कवडगाव आणि दिघी येथील बंधाऱ्यांचे काम कासवाच्या गतीने सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा, उन्हाळ्यातील सिंचन व्यवस्था आणि आगामी हंगाम यांचा विचार केला नाही तर हा भाग गंभीर संकटात सापडू शकतो. सरकार शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो, अशी टीका आमदार पवारांनी केली.
पुढे ते म्हणाले, उन्हाळ्यात पाण्याअभावी या भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई सरकारलाच करावी लागेल. या स्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन यंत्रणेची असेल,”असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
सीना नदीच्या काठावर सुरू असलेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीतील ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून तातडीने पूर्ण क्षमतेने कामे सुरू करण्याची मागणी वाढली आहे.
