Dr DY Patil: आधारवड हरपला..! शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; ५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात अंत्यसंस्कार - Rayat Samachar

Dr DY Patil: आधारवड हरपला..! शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; ५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात अंत्यसंस्कार

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

कोल्हापूर | ४ ऑगस्ट | रयत समाचार

Dr DY Patil: शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (वय ९१) यांचे मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील एक युग संपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

 

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “माझे वडील, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यातील आधारवड हरपला आहे.

दादांनी आयुष्यभर माणसं जोडली, शिक्षणाचा दीप लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रज्वलित केला आणि समाजसेवेला जीवनाचे ध्येय मानले.

माणूस म्हणून जगण्याचे संस्कार त्यांनी आम्हाला दिले. त्यांचा प्रेमळ मायेचा हात, धीर देणारे शब्द आणि मूल्यांसाठी जगण्याची शिकवण हीच आमची कायमची संपत्ती आहे. या भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.”

डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिलेली दिशा यामुळे त्यांना देशभरात विशेष मानाचे स्थान मिळाले. त्यांच्या निधनाने शिक्षणविश्वासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

अंत्यदर्शन व अंत्यसंस्काराचे वेळापत्रक

अंत्यदर्शन: बुधवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर

अंत्ययात्रा: सायंकाळी ४ वाजता, यशवंत निवास, कसबा बावडा येथून

अंत्यसंस्कार: सायंकाळी ५ वाजता, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading