मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
olympic पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आणि अनुभवी अमित पंघाल आणि जास्मिन लांबोरिया यांच्यानंतर प्रीती पवारलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. प्रीतीने कोलंबियाच्या पॅन अमेरिकन गेम्स चॅम्पियन आणि जागतिक रौप्यपदक विजेती येनी मार्सेला एरियासला महिलांच्या ५४ किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनलच्या लढतीत कडवे आव्हान दिले, परंतु असे असतानाही तिला २-३ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी, पंघाल पुरुषांच्या ५१ किलो गटात आणि नवोदित महिला बॉक्सर जस्मिन ५७ किलो गटातून बाहेर पडली. पंघालची पॅरिस ऑलिम्पिक मोहीम आफ्रिकन गेम्स चॅम्पियन आणि झांबियाच्या तिसरे मानांकित पॅट्रिक चिनयेम्बा यांच्याकडून १-४ ने पराभूत होऊन १६ च्या फेरीत संपुष्टात आली, तर जास्मिन टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती आणि फिलीपिन्सची माजी विश्वविजेती नेस्टी पेटेसिओकडून ०-५ ने पराभूत झाल्यामुळे बाहेर पडली.
पी. व्ही. सिंधूने ग्रुप स्टेजमधील सलग दुसरा सामना जिंकून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने इस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा २१-५, २१-१० असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. हा सामना ३४ मिनिटे चालला. सिंधूने पहिला गेम १४ मिनिटांत तर दुसरा गेम १९ मिनिटांत जिंकला. आता सिंधूसाठी पुढील वाटचाल अवघड असेल. बाद फेरीतील एकही पराभव बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत त्याने ५९० गुण मिळवले आणि सातवे स्थान पटकावले. पात्रता फेरीतील अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले. स्वप्नील आता उद्या पदकासाठी खेळताना दिसणार आहे. त्याचा अंतिम सामना गुरुवारी दुपारी एक वाजता होणार आहे. या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये लक्ष्य ठेवावे लागते. यामध्ये, एखाद्याला कुंचले/बसताना, झोपताना आणि उभे असताना लक्ष्य ठेवावे लागते. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग ११व्या स्थानावर पोहोचला. त्याचा स्कोर ५८९ होता.
भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा २१-१८, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासह लक्ष्यने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लक्ष्यने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूविरुद्ध पहिल्या गेममध्ये ८-१ ने जबरदस्त पुनरागमन करत गुणसंख्या ८-८ अशी बरोबरी साधली आणि नंतर पहिल्या मध्यमार्गी ब्रेकमध्ये ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. एका वेळी १८-१८ अशी बरोबरी होती. मात्र, त्यानंतर लक्ष्यने आपल्या नसानसांवर नियंत्रण ठेवत २१-१८ असा विजय मिळवला. पहिला गेम जिंकल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या गेममध्येही चांगली सुरुवात केली. मध्यांतराच्या ब्रेकमध्ये लक्ष्य पुन्हा आघाडीवर होता. यानंतर लक्ष्यने दुसरा गेम २१-१२ असा सहज जिंकला. हा सामना ५० मिनिटे चालला. लक्ष्यने पहिला गेम २८ मिनिटांत तर दुसरा गेम २३ मिनिटांत जिंकला. दोन्ही खेळाडूंसाठी ही करा किंवा मरा अशी स्पर्धा होती. पराभूत खेळाडूचा प्रवास पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संपला असता. अशा स्थितीत लक्ष्यने क्रिस्टीचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमधील आपला प्रवास पुढे चालू ठेवला.
भारतीय महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने १६ फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करत विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा सामना तिने एकतर्फी जिंकला.
महिला तिरंदाज दीपिका कुमारीने वैयक्तिक प्रकारात चमकदार कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिकाने नेदरलँडच्या क्विंटी रोफेनचा ६-२ असा पराभव केला.
सर्बियाचा २४ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविचने जर्मनीच्या डॉमिनिक कोपफरचा ७-५, ६-३ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचची आता शेवटच्या आठमध्ये ग्रीसच्या आठव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासशी लढत होईल. सित्सिपासने अर्जेंटिनाच्या सेबॅस्टियन बेझचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
टेबल टेनिस एकेरीत मनिका बत्राचा सामना जपानच्या मिऊ हिरानोशी झाला. मनिकाने पाचवा सेटही ११-६ असा गमावला. यासह मिऊने तिचा ४-१ असा पराभव केला. मनिकाचा महिला एकेरीतील प्रवास संपला.
धनुर्विद्या स्पर्धेसाठी तरुणदीप राय आणि हॉल टॉम समोरासमोर आले. तरुणदीप राय राउंड ऑफ ६४ मध्ये ग्रेट ब्रिटनच्या टॉम हॉलकडून ६-४ ने पराभूत झाला.
पुरुष एकेरी खेळाडू एचएस प्रणयने व्हिएतनामच्या ले डक फॅटचा १६-२१, २१-११, २१-१२ असा पराभव करत फेरी १६साठी पात्र ठरले. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सामन्यात त्याचा सामना लक्ष्य सेनशी होणार आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली.
निशांत देवने पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने सातव्या मानांकित खेळाडूचा ३-२ असा पराभव केला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत भारताच्या श्रीजा अकुलाचा पराभव झाला. सलग चार गेममध्ये तिला राउंड ऑफ १६ मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सन यिंग्साकडून पराभव पत्करावा लागला.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.