Mumbai news | मराठी शाळांच्या भूखंडांवर भूमाफियांची नजर; मराठी अभ्यास केंद्राचे आंदोलन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | ०९.११ | रयत समाचार

(Mumbai news) मुंबईतील मराठी शाळांच्या भूखंडांवर भूमाफियांची नजर असून स्ट्रक्चरल ऑडिटच्या माध्यमातून शाळा पाडण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी केला. माहिम येथील न्यू माहीम स्कूल पाडण्याच्या प्रस्तावाविरोधात आज आयोजित आंदोलनात ते बोलत होते.Mumbai news

(Mumbai news) या आंदोलनात अभिनेत्री व मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत, आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रणाली राऊत, आविष्कार नाट्यसंस्थेचे दीपक राजाध्यक्ष, नाटककार शफाअत खान, आर्थिकतज्ज्ञ संजीव चांदोरकर, पर्यावरण कार्यकर्ते मंगेश सावंत आदी सहभागी झाले. नाशिकसह अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार येथूनही मराठी शाळा समर्थक नागरिक या आंदोलनासाठी उपस्थित होते. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

(Mumbai news) यावेळी डॉ. पवार म्हणाले, शाळांच्या इमारतींना धोकादायक घोषित करून त्या बंद करण्याची पद्धत अवलंबली जात असून, भूखंडांवर इमारत प्रकल्प उभारण्याचा हेतू आहे. त्यांनी मुंबईतील किमान दहा मराठी शाळांचे भूखंड धोक्यात असल्याचे सांगितले.

चिन्मयी सुमीत यांनी मोरी रोडवरील महापालिकेच्या शाळेचे उदाहरण देत, इमारत धोकादायक म्हणून पाडून तीन-अडीच वर्षांनंतरही नवी इमारत उभी न केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. नवीन इमारत न उभा करता आणखी एक शाळा पाडणे योग्य कसे? असा सवाल त्यांनी केला.

शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत यांनी महापालिकेच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि आंदोलनातील मागण्या वाचून दाखवल्या.

न्यू माहीम स्कूलचे पाडकाम कायमचे थांबवण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी २ दिवसांत करावी. सर्व स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर तात्काळ प्रकाशित करावेत. डागडुजी केल्यानंतरही इमारती धोकादायक ठरत असल्यास संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत. मराठी शाळांचे केंद्रीय/आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये रूपांतर रद्द करावे. शाळांची पुनर्बांधणी निश्चित मुदतीत करावी आणि पुनर्बांधलेल्या शाळांमध्ये व्यावसायिक गाळे ठेवण्याची परवानगी रद्द करावी. महापालिकेच्या शिक्षण खर्चातील मराठी माध्यमावरील खर्चाची माहिती सार्वजनिक करावी. मराठीविरोधी शैक्षणिक धोरणे अंमलात न आणण्याची हमी घ्यावी, मराठी अभ्यास केंद्राने मागण्या या मागण्या केल्या आहेत.

महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने आंदोलनाची सांगता झाली.

Share This Article