मुंबई | गुरूदत्त वाकदेकर
येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि परिवर्तन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ता.१६ सप्टेंबर रोजी बहिणाबाईंच्या अजरामर कवितांचा सुरेल सांगितीक कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ सिने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, डॉ. श्यामकांत देवरे, नारायण बाविस्कर आणि राजश्री शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाईंच्या शेतीशी नातं सांगणाऱ्या कवितांनी झाली. ‘माझी माय सरस्वती’, ‘खोप्यामधी खोपा’, ‘धरतीच्या कुशीमंदी’ यांसह ना. धों. महानोर यांच्या कवितांचेही सादरीकरण करण्यात आले. शंभू पाटील यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमाला साहित्यिक उंची लाभली.
यावेळी शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, तर सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. काव्य आणि संगीताचा संगम अनुभवण्यासाठी काव्यप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.