मुंबई | १७.१२ | रयत समाचार
(Mumbai news) मराठी शाळांचे संरक्षण, जतन आणि बळकटीकरण या प्रमुख मागण्यांसाठी उद्या आयोजित करण्यात आलेला ‘मराठी शाळांसाठी मोर्चा’ हा पूर्णतः शांततेत, शिस्तबद्ध आणि कायदेशीर मार्गाने पार पाडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी ‘काय करायचे आणि काय करायचे नाही’ याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
(Mumbai news) आंदोलनकर्त्यांनी सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी हुतात्मा स्मारकापासून थोड्या अंतरावर एकत्र जमावे, तसेच स्मारक परिसर शांतता क्षेत्र असल्याने तेथे थेट जमाव करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. स्मारकाला अभिवादनानंतर सर्व आंदोलकांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाकडे शांतपणे कूच करायचे असून, आयुक्तांची भेट होईपर्यंत महापालिका परिसरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(Mumbai news) या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही घोषणा देऊ नयेत, पोलिस प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करावे आणि आंदोलन शांततेत पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक सहभागीची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्तांशी भेट झाल्यानंतर शिष्टमंडळ आंदोलकांसह प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देणार आहे. तसेच आंदोलनादरम्यान प्रमुख आंदोलकांवर कारवाई झाली, तरी उर्वरित आंदोलकांनी ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“हे आंदोलन आपल्या संयम आणि निर्धाराची कसोटी पाहणारे आहे. कोणत्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही आणि मराठी शाळांसाठीचा लढा थांबवायचा नाही,” असा ठाम संदेश आयोजकांनी दिला आहे.
