नवी मुंबई | २०.५ | रयत समाचार
(Literature) साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक भान जपणाऱ्या लेखनातून ओळख निर्माण केलेले कवी, लेखक आणि पत्रकार प्रदीप बडदे यांच्या ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ या पहिल्याच काव्यसंग्रहाला कोल्हापूर येथील नरेंद्र विद्यापीठाचा प्रतिष्ठित स्व.डॉ. न.ना. देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला. या मानाच्या पुरस्कारामुळे साहित्य क्षेत्रात बडदे यांच्या कार्याची व्यापक दखल घेतली जात आहे.
(Literature) ललित पब्लिकेशन, मुंबईतर्फे डिसेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहात मानवी संवेदना, समाजातील विसंगती, सामान्य माणसाचे प्रश्न आणि व्यवस्थेवरील परखड भाष्य प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. तळागाळातील वास्तवाला भिडणाऱ्या आणि मानवी मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कवितांमुळे हा संग्रह साहित्यप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
(Literature) या काव्यसंग्रहाला यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानचा पद्मश्री स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, मुंबई येथील स्व. अनंत जानू रुके स्मरणार्थ काव्यपुरस्कार, पुण्यातील तितिक्षा इंटरनॅशनल मुख्य ग्रंथ पुरस्कार तसेच पालघर जिल्ह्यातील रंगतदार साहित्य कला मंडळाचा काव्यसाधना पुरस्कार यांचा समावेश आहे. नरेंद्र विद्यापीठाचा हा पुरस्कार मिळाल्याने “माणुसकीची अंत्ययात्रा” या संग्रहाला मिळालेल्या सन्मानांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
प्रदीप बडदे हे ‘साहित्य उपेक्षितांचे’ या मासिकाचे कार्यकारी संपादक असून मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि गुजरातमधील विविध साहित्यिक मंचांवर मार्गदर्शक व संचालक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
या पुरस्काराचे आयोजन नरेंद्र विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. अरविंद देशपांडे आणि पी.एन. देशपांडे यांनी केले असून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत पोतदार यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे.
प्रदीप बडदे यांच्या या यशाबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून मित्रपरिवार, वाचक आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
