पुणे |१६.१२ | रयत समाचार
(Literature) वारकरी धर्माचा सुमारे सातशे वर्षांचा प्रदीर्घ, वैचारिक व सामाजिक इतिहास अत्यंत रसाळ आणि संदर्भसमृद्ध पद्धतीने मांडणारी विनायक होगाडे लिखित ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ ही कादंबरी वाचकांच्या हाती आली असून, तिचा प्रकाशन सोहळा नुकताच पत्रकार भवन, पुणे येथे रविवारी ता. १४ डिसेंबर उत्साहात पार पडला. यावेळी प्रविण बांदेकर, प्राजक्ता हनमघर, ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, मधुश्री’चे शरद अष्टेकर, विनायक होगाडे मंचावर उपस्थित होते.
(Literature) मधुश्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेल्या या ३६८ पानांच्या कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी प्रख्यात लेखक, साहित्यिक, अभ्यासक व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी कादंबरीतील आशय, मांडणी आणि सामाजिक आशयावर सविस्तर भाष्य केले.
(Literature) यावेळी बोलताना ज्ञानेश्वर बंडगर म्हणाले, ऐतिहासिक विषयांवर लिहिताना अनेकदा तथ्यांची मोडतोड होते. मात्र ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ ही त्याला ठळक अपवाद ठरणारी कादंबरी आहे. वारकरी संप्रदायाचा ७०० वर्षांचा इतिहास कोणतीही ऐतिहासिक विकृती न करता, प्रामाणिकपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने येथे मांडण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले, पारंपरिक इतिहासलेखनातील कोरडेपणा टाळत लेखकाने कादंबरीचा प्रभावी फॉर्म वापरला असून, त्यामुळे संपूर्ण इतिहास एक सशक्त कथानक म्हणून वाचकांसमोर उभा राहतो. नामदेवरायांपासून तुकोबारायांपर्यंत, तसेच चोखोबाराय, जनाबाई, कान्होपात्रा, एकनाथराय यांच्यापासून थेट गाडगेबाबा आणि साने गुरुजींपर्यंतची संतपरंपरा या कादंबरीत सुरेखपणे गुंफलेली आहे. गणपती महाराज अजात, निळू फुले यांसारखे आधुनिक संदर्भही कथेत सहजतेने पेरले गेले आहेत.
कादंबरी ऐतिहासिक असली तरी तिची दृष्टी समकालीन आहे. संकुचित धर्मवादी राजकारण, धार्मिक दांभिकता, अंधश्रद्धा, जातीय व लैंगिक भेदभाव यांवर ती ठामपणे बोट ठेवते. मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाची भूमिका बजावणारी ही कादंबरी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कादंबरीचे मुखपृष्ठ हर्षद मराठे यांनी रेखाटले असून, आतील रेखाटने भार्गव कुलकर्णी यांची आहेत. मांडणी व सजावट ममता झांजुर्णे-भोसले यांनी केली असून, सुलेखन प्रभाकर भोसले यांचे आहे. निर्मितीमूल्य, मांडणी आणि चित्रांबाबतही कादंबरी विशेष लक्षवेधी ठरते.
वारकरी संप्रदायाविषयी आजवर जे काही वाचण्यात आले, त्यात सर्वाधिक सकस आणि समग्र लेखन म्हणून ही कादंबरी ठरेल, असे गौरवोद्गार ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी काढले.
एकूणच, ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ ही कादंबरी साहित्यविश्वात महत्त्वाची भर घालणारी ठरत असून, अभ्यासक, वाचक आणि वारकरी परंपरेशी नाते असलेल्या सर्वांसाठी ती वाचनीय ठरणार आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
