बीड | २५.११ | रयत समाचार
(Literature) शिरूरकरांनी साहित्य चळवळ सातत्याने जोपासली आहे. अशी साहित्यिक चळवळ उभी राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहाव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि प्राचार्य दीपाताई क्षीरसागर यांनी केले. बीडमधील शिरूर कासार येथे सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या बोधचिन्हाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
(Literature) मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित या संमेलनाचे यंदाचे आयोजन १६ व १७ डिसेंबर रोजी शिरूर कासार येथे होणार आहे. या आगळ्या-वेगळ्या संमेलनाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून बोधचिन्हाचे अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.
(Literature) सिंदफणा नदी ही बीड जिल्ह्याची जीवनवाहिनी असल्याचे सांगून प्राचार्य क्षीरसागर म्हणाल्या की, सिंदफणेकाठी वसलेले भाषिक सांस्कृतिक जनजीवन आणि त्याची सृजनशील परंपरा साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा संदेश या बोधचिन्हातून प्रभावीपणे व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाला आजिनाथ गवळी, मसाप शिरूरचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक घोळवे, साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव, सतीश मुरकुटे, जमीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या विविध उपक्रमांसाठी स्थानिक साहित्यिक आणि सांस्कृतिक घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
