गोंदिया |२३.११ | रयत समाचार
(Literature) पूर्वविदर्भातील साहित्य, नाट्य, लोककला आणि संस्कृतीचा वैभवशाली वारसा जपणाऱ्या झाडीपट्टीची समृद्ध परंपरा उज्वल करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे ता.२८ व २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पहिल्या जिल्हास्तरीय झाडीपट्टी साहित्य-संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
(Literature) या संमेलनाला महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आर्थिक सहाय प्राप्त झाले आहे. झाडीपट्टीतील ज्येष्ठ नाटककार व अभिनेते प्राचार्य सदानंद बोरकर यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
(Literature) दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथा-कादंबरीकार आसाराम लोमटे यांच्या हस्ते होणार असून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार व राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. प्रवीण बांदेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोबतच मराठीतील प्रख्यात कवी प्राचार्य गोविंद काजरेकर तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांची विशेष उपस्थिती संमेलनात राहणार आहे.
अर्जुनी मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात आयोजित या संमेलनात झाडीपट्टीतील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणारे लोकनाट्यप्रयोग, लोकसंगीत सादरीकरणे, साहित्यविषयक चर्चा, झाडीपट्टी संस्कृतीचा वारसा यांवर विविध सत्रांचे आयोजन केले आहे. या संमेलनामुळे झाडीपट्टीच्या ओळखीला नवे आयाम मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : मराठी विश्वकोश
