Ipl

Literature | माणसातल्या माणसाचा शोध : लेखक कवी तु.सी ढिकले यांच्या ग्रंथांचे 28 मार्च रोजी प्रकाशन

SubEditor | Dipak Shirasath

साहित्यवार्ता | १०.३ | रयत समाचार

(Literature) यापूर्वी माझे चार कवितासंग्रह – सृजनगान, सोनचाफा, लेणे सृजनाचे, मी खोदतोय लेणी,
एक स्मृतीग्रंथ – पराग स्मृतीगंध,
तसेच दोन वैचारिक पुस्तके – वैदिक धर्मकांड आणि सत्य-असत्याशी मन करा रे ग्वाही. या पुस्तकांचे आपण मनापासून स्वागत केले.

(Literature) आता ‘राहिले ते तीर्थ’ आणि ‘भाजके फुटाणे अन् खारे शेंगदाणे’ ही दोन नवी पुस्तके मी तुम्हा रसिकांच्या हाती सोपवत आहे. ‘राहिले ते तीर्थ’ हा माझा आत्मबंधात्मक ललित लेखसंग्रह आहे. हे कुणाला माझे आत्मचरित्र वाटेल; परंतु हे काही माझे आत्मचरित्र नाही.

(Literature) या पुस्तकात माझ्या बालपणीच्या, मला भावलेल्या आणि माझ्या मनाच्या तळाशी साचून राहिलेल्या काही आठवणी जरूर आहेत. माझा गाव, माझे शिक्षण, आईवडील, शेतीमाती, मला भेटलेली आणि भावलेली सोन्यासारखी काही माणसे, माझ्या गावाचे भूषण, आमच्या गावाचा आधारवड, माजी खासदार/ आमदार, आमच्या गावातील पहिले साहित्यिक अशा अनेक व्यक्तींचा उल्लेख या पुस्तकात आहे.

- Advertisement -
Ad image

तसेच आमचे दादा, सहकार महर्षी कै. उत्तमराव नथुजी ढिकले यांच्याविषयीचा एक विस्तृत लेखही या पुस्तकात समाविष्ट आहे. याशिवाय ‘आपण कोठे चाललो आहोत?’ हा भविष्याचा वेध घेणारा चिंतनपर लेखही या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे माझा आत्मशोध आहे. माझे आत्मचिंतन आहे. हा माझ्या जगण्याचा धांडोळा आहे.

मी माझ्या वाट्याला आलेल्या भूतकाळातील काही तुकड्यांचे कोलाज वर्तमानावर चिकटवून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिहित असताना माझी वैचारिकता कुठेही ढळू दिली नाही. ‘आपण कोठे चाललो आहोत?’ हा लेख म्हणजे याच गोष्टीचे ठोस प्रतिबिंब आहे.

माझे कोणतेही लेखन म्हणजे कविता, गझल, विडंबन किंवा कोणताही लेख हे नेहमी सकारात्मक, सृजनात्मक आणि वास्तववादी विचारांकडे दिशा दाखवणारे असते. माझे कोणतेही लेखन स्वांतसुखाय कधीच नसते.

संत तुकारामांचा हा विचार माझ्या सर्व लेखनाचा पाया आहे, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.’ हा विचार फार मोलाचा आहे, असे मला वाटते. कारण आजही ती काळाची गरज आहे.

आजही शिव- फुले- शाहू- आंबेडकरांचा विचार समाजात पुरेशा प्रमाणात रुजलेला नाही. अजूनही जातीपातीच्या जळमटातून आपला रूढीग्रस्त समाज बाहेर पडायला तयार नाही. अजूनही आपण आपल्या जाती घट्ट धरून बसलो आहोत. एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आव्हान देत आहे. सर्व समाज जातीधर्मात विभागला गेला आहे. जातीधर्माशिवाय फक्त माणसातला माणूस आज औषधालाही सापडत नाही!

म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात’ ‘गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी.’ म्हणूनच आमचे मित्र माणूसमित्र सुरेश पवार सर कायम आवाहन करीत असतात, ‘हात नको, मने जोडा. मना- मनातील अंतर तोडा!’

अजूनही या भयान वास्तवाची आणि त्याच्या भीषण परिणामांची जाणीव समाजाला आणि साहित्यिकांनाही होत नसेल, तर ती सर्वांच्याच भविष्यासाठी एकूणच जगाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा ठरेल. हा माझा विचार ‘आपण कोठे चाललो आहोत?’ या माझ्या लेखाचा मतितार्थ आहे.

विडंबन : विडंबनाविषयी थोडेसे…

विडंबन म्हणजे वाङ्मयीन वेडावणे! कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या या गीतावर, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी’ मी असे विडंबन गीत लिहिले आहे, कोरोनाच्या काळामधली राजा आणिक राणी…सोशल डिस्टन्स नियम पाळुनी रंगली प्रेमकहाणी’

विडंबन म्हणजे एखाद्या दुसऱ्या कवितेच्या साच्यामध्ये किंवा त्याच वृत्तामध्ये, परंतु वेगळा मिश्किल आशय घेऊन केलेली वेगळी रचना असते. या रचनेत उपरोध, अतिशयोक्ती किंवा व्यंग निर्माण करणारा मार्मिक आशय असतो. त्यातील सरळ शब्दार्थापेक्षा त्यामागील भावार्थ अधिक महत्त्वाचा असतो.

माझी ही पुस्तके महाराष्ट्राचे प्रसिद्ध वात्रटिकाकार आणि आपल्या मिश्किल काव्यरचनांनी रसिकांना हसविणारे कविवर्य नरेश महाजन सर, तसेच माजी आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक नानासाहेब बोरस्ते सर यांच्या हस्ते प्रकाशित होत आहेत.

शनिवारी, ता. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. आपण सर्व रसिकांना माझी ही दोन्ही पुस्तके आवडतील, अशी आशा व्यक्त करतो.
– लेखक कवी तु. सी. ढिकले

 

Share This Article