(Ipl) आयपीएल २०२५ च्या साखळी फेरीत शनिवारी पार पडलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४२ धावांनी पराभव करत गुणतालिकेत नवे समीकरण निर्माण केले. या पराभवामुळे आरसीबीचे अव्वल दोन संघांतील स्थान धुसर झाले असून, पंजाब किंग्जने त्यांना मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे.
(Ipl) इशान किशनचे नाबाद ९४ धावांचे तडाखेबाज योगदान : पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्सने २० षटकांत ६ बाद २३१ धावा फटकावत आरसीबीसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. संघाचा प्रमुख फलंदाज इशान किशनने अव्वल कामगिरी करत ४८ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ९४ धावा कुटल्या. त्याला अनिकेत वर्मा (२६ धावा), हेनरिक क्लासेन (२४ धावा) यांची उत्तम साथ मिळाली.
(Ipl) सॉल्ट-कोहलीची चांगली सुरुवात फोल ठरली : लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने ८० धावांची भागीदारी करत पॉवर प्लेचा उत्कृष्ट उपयोग केला. सहा षटकांत बिनबाद ७२ धावा जमवल्या. मात्र, हर्ष दुबेने कोहलीला (२५ चेंडूत ४३ धावा) बाद करत सनरायझर्सला पहिलं यश मिळवून दिलं.
सॉल्टने संघर्ष करत ३२ चेंडूत ६२ धावा केल्या, परंतु त्याच्या बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी कोसळू लागली. १५व्या षटकात १६७ धावा करताना केवळ तीन गडी बाद झालेले आरसीबीचे फलंदाज शेवटच्या पाच षटकांत केवळ २२ धावा करू शकले आणि उर्वरित सात गडी गमावले.
गोलंदाजांचा अचूक मारा : सनरायझर्सच्या गोलंदाजांनी शेवटच्या टप्प्यात भेदक मारा करत सामन्यावर शिक्कामोर्तब केले. कर्णधार पॅट कमिन्सने ३ गडी बाद करत निर्णायक भूमिका बजावली, तर इशान मलिंगा, जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबे यांनी महत्वाचे बळी घेतले. आरसीबीचा डाव १९.५ षटकांत १८९ धावांवर आटोपला.
गुणतालिका स्थिती : या विजयामुळे गुणतालिकेत गुजरात १८ गुणांसह अव्वल, तर पंजाब किंग्ज १७ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. आरसीबीचे देखील १७ गुण असले तरी त्यांचा केवळ एक सामना शिल्लक असून पंजाबचे दोन सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्स १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.