पुणे | रयत समाचार
पुण्यातील दिगंबर जैन बोर्डिंग व जैन मंदिराची जागा हडपल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. पैशाच्या हव्यासापोटी जर असंच सुरू राहिलं, तर एक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीमबाग मुख्यालयही भाजपचे मंत्री लिलावात काढायला मागेपुढे पाहणार नाहीत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेळीच सावध व्हावं, अशी तीव्र टीका शेट्टींनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाने धर्मादाय ट्रस्टची तब्बल ३,००० कोटींची मालमत्ता फक्त २३० कोटींना विकण्याचा डाव रचला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाविरोधात जैन समाजासह विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने मॉडेल कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
सन १९५८ साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी पुण्यातील मॉडेल कॉलनी येथे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तीन एकर जागेत दिगंबर जैन बोर्डिंग व जैन मंदिर उभारले होते. या बोर्डिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, आहिल्यानगर आदी जिल्ह्यांतील अनेक वंचित विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःचा जम बसवला.
दोषी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे आणि दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे उदात्त कार्य उभारले होते. मात्र, त्यांचे वारसदारांनी आता तीच तीन एकर जागा गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला २३० कोटी रुपयांना विकली असल्याचे समोर आले.
या व्यवहारासाठी ३० सप्टेंबर २०२५ रोजी साठेखत करण्यात आले असून, १ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्नाटकातील बिरेश्वर पतसंस्थेकडून ५० कोटी आणि बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडून २० कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. जागेचा व्यवहार अद्याप न्यायालयीन वादात असतानाही गोखले कंपनीला ती जागा मिळेल या गृहीतकावर कर्ज मंजूर झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शेट्टींनी आरोप केला की, धर्मादाय आयुक्तांनी नियमबाह्यपणे या विक्रीला मंजुरी दिली असून, हे आयुक्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे नातेवाईक आहेत. तर गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ भागीदार आहेत. गोखले कंपनीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकल्पातून ३००० कोटी रुपयांचा नफा मिळणार असल्याचे खुलेपणाने सांगितले होते. म्हणजेच ३००० कोटींची मालमत्ता फक्त २३० कोटींना विकण्याचा राजाश्रययुक्त व्यवहार झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला.
पुणे हे विद्येचं माहेरघर असताना इथल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या संस्थांचे लचके तोडले जात आहेत. धर्म आणि शिक्षणाच्या नावाखाली पैशाचा हव्यास वाढतोय. जर वेळीच या लोकांना आवर घातला नाही, तर उद्या RSSच्याही रेशीमबागेचा लिलाव बघावा लागेल, असा कडाडून इशारा राजू शेट्टींनी दिला.
