परभणी | ९ जुलै | प्रतिनिधी
(India news) कामगार आणि कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपाला ९ जुलै रोजी जोरदार प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्ह्यात आयटक व किसान सभेच्या वतीने परभणी, गंगाखेड, मानवत, पाथरी, सेलू व सोनपेठ येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चे, धरणे व निदर्शने करण्यात आली. याबाबतची माहिती ॲड. माधुरी क्षीरसागर यांनी दिली.
(India news) या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचारी, रेशन गोदाम व रेल्वे गुड्समधील हमाल-माथाडी कामगार यांनी १००% सहभाग नोंदवला. आयटक संलग्न एमएससीबी वर्कर्स फेडरेशन, कंत्राटी बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी, शिक्षकवर्ग यांचाही संपात सक्रीय सहभाग दिसून आला.
(India news) केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व कर्मचारी विरोधी धोरणाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. चार लेबर कोड रद्द करावेत, जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे, योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे, कंत्राटीकरण व आऊटसोर्सिंग बंद करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील एफआरएस सक्ती थांबवावी, नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे, तसेच सर्व विभागातील कर्मचारी भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या.
