मुंबई | १४.१२ | रयत समाचार
(India news) प्रख्यात शेफ रॉकी मोहन यांच्या शेफपीएन या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वादसूत्र–२०२५’ या राष्ट्रीय पातळीवरील पाककला स्पर्धेत पुण्याच्या आश्विनी कसबे-अवघडे यांनी पहिला क्रमांक पटकावून मानाचा मुकुट मिळवला.

(India news) गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे भरलेल्या १७ व्या इंटरनॅशनल फूड अँड बिव्हरेज ट्रेड एक्स्पो अंतर्गत ‘परंपरागत अन्नपदार्थ’ या थीमवर ही स्पर्धा पार पडली. देशभरातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून अंतिम फेरीसाठी सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.
(India news) अंतिम फेरीत आश्विनी कसबे-अवघडे यांनी पुरणपोळी आणि कटाची आमटी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ सादर केला. चव, सादरीकरण आणि परंपरेशी असलेली नाळ या सर्व निकषांवर त्यांच्या पाककृतीने परीक्षकांची विशेष दाद मिळवली.
स्पर्धेसाठी प्रख्यात शेफ व ब्लॉगर कुरुप दलाल, अन्नपूर्णाचे सीईओ सिद्धार्थ मोहन, शेफ राखी वासवानी, नामवंत फूड ब्लॉगर कुणाल विजयकर आणि शेफ निशाण चौबे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व परीक्षकांनी एकमताने आश्विनी कसबे-अवघडे यांच्या पाककलेवर पसंतीची मोहोर उमटवली.
पुण्याच्या आश्विनी कसबे-अवघडे यांच्यामुळे परंपरागत मराठी खाद्यसंस्कृतीचा देशपातळीवर गौरव होत असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
