India news | सीएसआरडीचा पूरग्रस्तांसाठी ‘कृषक संजीवनी’ उपक्रम; मदतकार्य व समुपदेशनासाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित; साहित्य संकलनाचे आवाहन

India news | सीएसआरडीचा पूरग्रस्तांसाठी ‘कृषक संजीवनी’ उपक्रम; मदतकार्य व समुपदेशनासाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित; साहित्य संकलनाचे आवाहन

अहमदनगर | २८.९ | रयत समाचार

(India news) अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, ग्रामिण कारागिर व त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची छप्परे उडाली, धान्यसाठे वाहून गेले, जनावरांची जीवितहानी झाली, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व दैनंदिन जगण्याच्या वस्तू पाण्याबरोबर वाहून गेल्या. या संकटात अन्नदाता शेतकरी बांधव अक्षरशः हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना नव्याने उभे राहण्यासाठी समाजाने मदतीचा हात पुढे करणे ही काळाची गरज आहे. याच सामाजिक जबाबदारीतून अहिल्यानगर बीपीएचईएसचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेमार्फत ‘कृषक संजीवनी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत केवळ वस्तुरूप मदतच नव्हे तर मानसिक आरोग्य आणि तणावमुक्तीसाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली.

(India news) अधिक माहिती देताना ते म्हणाले, यामध्ये सीएसआरडीमधील प्राध्यापक, कर्मचारी आणि एमएसडब्ल्यूसह बीजेएमसी पत्रकारीतेचे विद्यार्थी सक्रियपणे सहभागी झाले असून समन्वय समिती स्थापन केली आहे. या मोहिमेत विद्यार्थी स्वयंसेवक सक्रीयपणे सहभागी होणार असून ते प्रथम अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष अभ्यास करून गावागावातील अडचणी, आवश्यकतेनुसार लागणारी मदत, शेतकरी कुटुंबांची परिस्थिती याचा आढावा घेतील तसेच त्यानंतर प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होणार आहेत.

(India news) या संदर्भात गावातील सरपंचांना आवाहन करण्यात आले की, आपल्या गावाला नेमकी कोणती मदत आवश्यक आहे, कोणत्या कुटुंबांना कोणत्या स्वरूपाची मदतीची गरज आहे याची माहिती सीएसआरडीला द्यावी. सीएसआरडीचे विद्यार्थी स्वयंसेवक ज्यावेळी गावात येतील त्यांना सहकार्य करावे. ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या गरजांच्या यादीनुसार समाजातून मदत उभी करून ती योग्य व गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात येईल.

यासाठी सीएसआरडी येथे मदत साहित्य संकलन केंद्र तयार करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांनी उदारतेने वस्तुरूप योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. मदतीसाठी आवश्यक वस्तूंमध्ये अन्नधान्य जसे तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळी, स्वयंपाकाचे तेल, बिस्किटे, तयार खाण्याचे पदार्थ, मीठ, साखर, चहा पावडर, दैनंदिन वापरातील वस्तू जसे साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल, कंगवा, टॉवेल, चादरी, ब्लँकेट, पाण्याच्या बाटल्या तसेच स्वच्छता आणि आरोग्यविषयक वस्तू जसे सॅनिटरी नॅपकिन्स, टिश्यू रोल्स, हॅण्ड सॅनिटायझर्स, डेटॉल, फिनाईल आदींचा समावेश आहे. सर्व वस्तू नवीन, न वापरलेल्या व व्यवस्थित पॅक केलेल्या असाव्यात. सोमवारपासून पुढे दररोज सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत साहित्य स्वीकारले जाईल.

डॉ.पठारे पुढे म्हणाले, बळीराजाला या संकटकाळात आधार देणे ही खरी मानवसेवा आहे. आपण दिलेली छोटीशी मदतही त्यांच्या जीवनात नवा आधार ठरू शकते, अधिक माहितीसाठी व समन्वयासाठी नागरिकांनी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ च्या ९४२२०६३६१६ वर संपर्क साधावा, या हेल्पलाईनद्वारे नागरिकांच्या समस्या आपुलकीने समजावून घेतल्या जातात, त्यामुळे या संकटकाळात गोंधळून न जाता मदत हवी असल्यास या हेल्पलाईन नंबरवर गरजू नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी केले.

 

Health Public issue अहमदनगर आरोग्य आर्थिक आवाहन कृषि जिल्हा जिल्हाधिकारी देश महाराष्ट्र शिक्षण