महाराष्ट्रसंवाद | २९ जून | कुमार कदम
(India news) महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती केल्याच्या विरोधात माझे मित्र डॉ. दीपक पवार यांनी त्यांच्या शालेय शिक्षण अभ्यास कृती समन्वय समितीतर्फे पत्रकार भवनात शिक्षण तज्ज्ञ, भाषा अभ्यासक, राजकीय नेते आणि मराठी जनतेच्या उपस्थितीत आज, रविवारी एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक वर्षाचे आपले मतभेद बाजूला ठेऊन मराठीच्या याच मुद्द्यावर येत्या ५ जुलै २०२५ रोजी एका मोर्चाचे आयोजन केले आहे.
(India news) मराठीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातील हे असंतोषाचे वातावरण महाराष्ट्रात पुन्हा एकदा तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने बेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे ७ मार्च १९८३ रोजी मुंबईच्या दूरदर्शनवर केंद्रावर काढण्यात आलेल्या मोर्चाची मला आठवण झाली. या मोर्चामुळे केंद्र सरकारला दूरदर्शनवर खास मराठीसाठी दुसऱ्या स्वतंत्र चॅनलची निर्मिती करावी लागली. हा यशस्वी लढा महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक भाग बनला आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न कामी लागले याचा मला खूप खूप अभिमान आहे. त्यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचा मी अध्यक्ष होतो.
(India news) दूरदर्शनच्या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेची गळचेपी केले जाते, असे आढळून आल्यामुळे त्या विरोधात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी दूरदर्शनवर मोर्चा काढावा, असे निश्चित केले. मात्र या मोर्चाला कोणत्याही परिस्थितीत राजकीय रंग येणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली गेली. या मोर्चाला सर्वकष स्वरूप देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघात मुंबईतील सर्व मराठी संघटनांचे पदाधिकारी आणि महत्त्वाच्या व्यक्तींची बैठक बोलाविण्यात आली.
या बैठकीत मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे, मराठी चित्रपट महामंडळ, मराठी नाट्य परिषद, मुंबई महानगर साहित्य संमेलन, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, स्थानिय लोकाधिकार समिती, कोकण विकास आघाडी, ग्रंथाली वाचक चळवळ, त्याचप्रमाणे संगीतकार स्व. सुधीर फडके, अभिनेते स्व. दाजी भाटवडेकर, स्थानिय लोकाधिकार समितीचे नेते स्व. सुधीरभाऊ जोशी आदी दिग्गज मंडळी सहभागी झाली होती. या बैठकीत माझ्या अध्यक्षतेखाली “मुंबई मराठी पत्रकार संघ पुरस्कृत दूरदर्शन मराठी अन्यायविरोधी संघर्ष समिती”ची स्थापना करण्यात आली आणि लढ्याला अंतिम स्वरूप देण्यात आले.
या मोर्चाला राजकीय रंग येऊ नये म्हणून शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांना मोर्चापासून दूर ठेवण्यात आले होते. अपवाद फक्त शिवसेनेची स्थानिय लोकाधिकार समिती आणि तिचे अध्यक्ष सुधीरभाऊ जोशी यांचा केला गेला होता. तरीही मुंबईतील सर्व राजकीय पक्ष तसेच अखिल भारतीय माथाडी कामगार युनियन, दत्ता सामंत यांची कामगार आघाडी, इतर कामगार संघटना, क्रीडापटूंच्या विविध संघटना यांनी मोर्चाला पाठींबा जाहीर केला.
दादरच्या सिध्दीविनायक मंदिराशेजारच्या साने गुरूजी उद्यानापासून ते मुंबई दूरदर्शन केंद्र एवढ्या अंतराचा हा मोर्चा होता. पण त्यात लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. इतकेच नव्हे तर मुंबई महानगर पालिकेची त्या दिवशीची सर्वसाधारण सभा तहकूब करून सर्व नगरसेवक महापौर स्व. डॉ. मनमोहनसिंग बेदी यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चात सामिल झाले. मोर्चा अत्यंत शांततेने नेण्याचे आमच्या बैठकीत ठरले होते. मोर्च्यातील घोषणाही तशाच पध्दतीच्या असाव्यात असेही निश्चित केले गेले होते. पण मोर्च्याला सुरूवात झाली आणि उत्साही नगरसेवक छगन भुजबळ यांनी “जला दो, जला दो, दूरदर्शन केंद्र जला दो !” अशी घोषणा दिली आणि वातावरण एकदम गंभीर झाले. या घोषणेमुळे बाबूजी म्हणजे सुधीर फडके खूप अस्वस्थ झाले. ते धावत माझ्याकडे आले आणि म्हणाले की, “कदम ही घोषणा प्रथम थांबवा, या मोर्च्याला एक प्रतिष्ठा लाभली आहे, ती कोणाला घालवू देऊ नका”. मी लागलीच भुजबळ यांच्याकडे गेलो आणि त्यांना घोषणा थांबविण्याची विनंती केली, पण ऐकतील ते भुजबळ कसले. ते म्हणाले, “बाबूजींना सांगा, ताक पिऊन लढाई करता येत नाही”. मग मला अक्षरशः गयावया करायला लागली. इतर थोर मंडळींनीही मध्यस्थी केली आणि भुजबळांना शांत केले.
मोर्चा खूपच चांगला आणि यशस्वीही झाला. मोर्च्याच्या वतीने दूरदर्शन केंद्राचे तत्कालीन संचालक श्री. तातारी यांना (हे काश्मिरी गृहस्थ होते) शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे नंतर तत्कालीन केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री एल.के. भगत यांचीही भेट घेण्यात आली. मोर्च्याची खूप गांभीर्याने दखल घेतली ती महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी !
मोर्चा संपला आणि मी ‘हिन्दुस्थान समाचार’ मध्ये माझ्या ड्युटीवर गेलो. थोड्याच वेळात राज्याचे तत्कालीन गृहसचीव स्व. बी.के. उर्फ बापूसाहेब चौगुले यांचा मला लँडलाईनवर फोन आला. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचे आहे.” दादा फोनवर आले. मला म्हणाले, “मी आता दिल्लीला निघालो आहे, तुमच्या संघर्षाचे गांभीर्य मी पंतप्रधानांच्या, (तेव्हा स्व. इंदिराजी पंतप्रधान होत्या) कानी घालतो. प्रश्न तुमचा नाही, महाराष्ट्राचा आहे, तो मी सोडवून घेतो. पण तुम्ही आता या प्रश्नाला अधिक धार देऊ नका, असे माझे सांगणे आहे.” मी दादांना “ठीक आहे,” असे म्हटले.
काही दिवसातच तत्कालीन केंद्रीय माहिती आणि नभोवाणी राज्यमंत्री स्व. विठ्ठलराव गाडगीळ मुंबईला आले. त्यांनी मला मलबार हिलवरील सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावून घेतले आणि लवकरच मुंबई दूरदर्शन केंद्रावरून खास मराठीसाठी दुसरे चॅनेल सुरू केले जाणार असल्याची माहिती दिली. हा ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ आणि त्याने पुरस्कृत केलेल्या ‘दूरदर्शन मराठी अन्यायविरोधी संघर्ष समिती’चा खऱ्या अर्थाने आणि प्रचंड विजय होता. या समितीच्या मोर्चाला सर्व थरातील मराठी माणसांकडून जसा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, तसा प्रतिसाद यावेळीही मिळावा ही अपेक्षा!

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
