श्रीगोंदा | १६ जून | गौरव लष्करे
(History) जिजाऊ ब्रिगेड संघटनेच्या प्रदेश महिला पदाधिकाऱ्यांनी इतिहासाची साक्षात अनुभूती घेण्यासाठी तालुक्यातील पेडगाव (ता. अहमदनगर) येथील किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याच्या खुणा जपणाऱ्या या गडावर त्यांनी “शौर्यस्थळाचे” पूजन करून अभिवादन केले आणि त्या ठिकाणचा वास्तव इतिहास जाणून घेतला.
(History) या विशेष भेटीत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सिमा बोके, प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अश्विनी देवके, कार्याध्यक्षा राजश्री शितोळे, सहसंघटक डॉ. कल्पना ठुबे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती जाधव, जिल्हा उपाध्यक्षा अलका पवार आदी पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. या सर्वांचे स्वागत राजेशिर्के वंशज घराण्याच्यावतीने करण्यात आले.
(History) यावेळी लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी “किल्ले धर्मवीरगडाचा प्राचीन व वास्तव इतिहास” उलगडून सांगितला. त्यांनी महाराणी येसुबाई साहेब आणि स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांच्या वंशज या नात्याने गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर १६८९ साली येथे घडलेल्या तेजस्वी व बाणेदार घटनांचा इतिहास उपस्थितांना सांगितला, जो आजही अनेकांच्या दृष्टीआड राहिला आहे.
भेटीदरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गडावर सुरु असलेल्या संवर्धन कार्याची पाहणी केली व स्थानिक ग्रामस्थ व शंभुभक्तांकडून सुरू असलेल्या ऐतिहासिक वारशाच्या जतनाच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. गडदुर्ग संस्कृतीचा जागर, इतिहासाचे सन्मानाने स्मरण आणि महिला नेतृत्वातून घडणारी ही प्रबोधनयात्रा यामुळे हा दौरा लक्षवेधी ठरला.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक