पणजी | २ मार्च | प्रतिनिधी
(Goa news) गेल्या दोन दिवसांमागेच नव्हे, तर यापूर्वीही, गोव्यातील राष्ट्रवादाशी निगडित विषयांवर, सामान्यजनांचा बुद्धिभेद करू पाहणारी विधाने, नेमकीं विशिष्ट वेळीच, सुनियोजितपणे मांडण्याच्या कारस्थानात एक मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत ॲड. उदयबाब भेंब्रे हेही सामील झालेले पाहून मोठा खेद नि खंत वाटली, असे मत प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसारमाध्यमांकडे मांडले.
(Goa news) अधिक माहिती देताना त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत असताना, ॲड. उदय भेंब्रे यांनी ऐतिहासिक तथ्ये डावलून, गोव्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व खोडसाळ विधाने केली. या विधानांचा आणि त्यामागील घृणास्पद वृत्तीचा मी तीव्र निषेध करतो.
(Goa news) प्राचार्य वेलिंगकर यांनी पुढे म्हटले, “शिवराय हे पोर्तुगीजांचे मित्र होते. त्यांनी पोर्तुगीजांना हाकलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.” बार्देशवरील स्वारीच्या वेळी त्यांनी बायकामुले पळवून नेली.”आणि तीन निष्पाप,निरपराध पाद्रींना ठार मारले”, “शिवरायांनी गोव्यावर कधीच राज्य केले नाही.”, ही आपल्याला हवी तशी तर्क-विधाने, ऐतिहासिक आधार देण्याचा आव आणीत, ॲड.भेंब्रे यांनी केली आहेत, तीं केवळ राष्ट्रवादी गोमंतकीय जनतेशीच केलेली प्रतारणा नव्हे, तर इतिहासाशीच केलेला द्रोह आहे.