गोव्याचा देशातील एक आदर्श शैक्षणिक राज्य म्हणून नावलौकिक
पणजी | ६ एप्रिल | प्रभाकर ढगे
(Goa news) गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एसएससी (SSC) मार्च २०२५ परीक्षा १ मार्च ते २१ मार्च २०२५ या कालावधीत झाली. या परीक्षेसाठी एकूण ३२ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. परीक्षेला नियमित प्रवर्गातून १८,८३८ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ९,२८० मुले व ९,५५८ मुलींचा समावेश होता. या परीक्षेचा निकाल ७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गोवा बोर्डाच्या पर्वरी येथील कार्यालयात जाहीर होणार. निकालाच्या दिवशी www.gbshse.in तसेच https://results.gbshsegoa.net/#/ या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होणार. त्याशिवाय डिजीलॉकर अॅप व संकेतस्थळावरही निकाल पाहता येणार आहे.
(Goa news) मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिलपासून शाळांसाठी संयुक्त निकालपत्र संकेतस्थळावरून https://service1.gbshse.in उपलब्ध होईल. शाळांसाठी निकाल पुस्तिकासुद्धा अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.
(Goa news) यंदा परीक्षा संपल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत निकाल जाहीर करणे हे मोठे यश मानले जात आहे. सामान्यतः अनेक राज्यांमध्ये निकाल जाहीर करण्यास महिन्याभरापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र गोवा बोर्डाने वेगवेगळ्या श्रेणीतील परीक्षार्थींची माहिती, परीक्षा केंद्रांची संख्या आणि अन्य प्रक्रिया वेळेत पार पाडत विक्रमी वेळेत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया इतक्या वेगात पार पाडणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या ऐतिहासिक यशामागे गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, नियोजन आणि कार्यक्षमतेचा मोठा वाटा आहे.
परीक्षा प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन. यावर्षी भगीरथ शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डाने मूल्यांकन केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली. यामुळे परीक्षकांना जवळच्या केंद्रांवर सहजपणे पोहोचता आले आणि मूल्यांकन प्रक्रियेत वेग आला. अध्यक्ष शेट्ये यांनी नियोजनबद्ध पूर्वक परीक्षा संपण्याआधीच मूल्यांकन केंद्रांची आखणी केली होती, ज्यामुळे वेळेची बचत झाली.
तसेच परिक्षक व शाळांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद हे देखील या यशाचे एक महत्त्वाचे कारण ठरले. अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी प्रत्येक परिक्षक व शाळेशी थेट संपर्क ठेवून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. शाळांनीही शेट्ये यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या परिक्षकांना वेळेवर पाठवले.
या सर्व प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यात आला. उत्तरपत्रिकांचे डिजिटल ट्रॅकिंग, त्वरित तपासणीचे सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन फीडिंग यामुळे वेळ वाचवला गेला. अध्यक्ष शेट्ये यांनी या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आणि त्यासाठी आवश्यक त्या सुविधा बोर्डकडून उपलब्ध करून दिल्या.
विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावर्षी एप्रिल मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वर्षभरापासून मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ.प्रमोद सावंत तसेच शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बैठका संपन्न झाल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील परख संस्थेची कार्यशाळा देखील नुकतीच संपन्न होऊन राज्यातील शिक्षकांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले हे सर्व घटक विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होण्यासाठी तसेच देशातील इतर मंडळांशी सुसंगतता राखण्यासाठी दहावीचा निकाल लवकर लागणे आवश्यक होते. त्यामुळे या निकालाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांना लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे पुढील अभ्यासक्रमासाठी वेळेवर अर्ज करता येणार आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनीही भगीरथ शेट्ये यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गोवा राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. भगीरथ शेट्ये यांच्या नेतृत्वाने गोवा बोर्डाला नव्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच संपूर्ण गोवा राज्यात शिक्षण व्यवस्था अधिक गतिमान आणि पारदर्शक बनली आहे.
शेट्ये यांचे ध्येय केवळ निकाल वेळेवर जाहीर करणे नव्हते, तर विद्यार्थ्यांचा विश्वास आणि भविष्य सुरक्षित ठेवणे हेही होते. त्यांच्या मार्गदर्शनाने परीक्षा प्रक्रियेत जो बदल झाला आहे, तो पुढील अनेक वर्षांसाठी एक आदर्श ठरेल. राष्ट्रीय स्तरावर परखने अलीकडेच गोवा बोर्ड अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतर शालांत परीक्षेचा निकाल अवघ्या पंधरा दिवसाच्या कालावधित जाहीर होणार असल्यामुळे आणखी एक मानाचा तुरा गोवा बोर्डच्या शिरपेचात खोवला जाणार आहे.
भविष्यातही असेच कार्यक्षम निर्णय घेतले गेले, तर गोवा राज्य देशातील एक आदर्श शैक्षणिक राज्य म्हणून नावलौकिक मिळवेल यात शंका नाही. भगीरथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली गोवा बोर्डाची वाटचाल अधिक गतिमान व गुणवत्तापूर्ण होईल, अशीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
