(Goa news) मराठी साहित्यक्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक छाया पुसेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी त्यांना अधिकृत निवडीचे पत्र देत शुभेच्छा दिल्या.
(Goa news) छाया पुसेकर या गेली अनेक वर्षे साहित्यक्षेत्रात सक्रीय असून त्यांचे माणूस, अनुभूती, मेंहदीच्या नक्षी, हवाय मज श्वास मोकळा आणि स्मृतीगंध हे लोकप्रिय ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. विविध सामाजिक व साहित्यिक मंचांवर त्या सन्मानित झाल्या असून, त्यांच्या लेखनात मानवी भावभावनांचा सूक्ष्म अभ्यास आणि स्त्री-अनुभवांचे प्रगल्भ दर्शन घडते.
(Goa news) गोव्यात पत्रकार म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले असून त्या अनुभवाच्या बळावर त्या साहित्य संवर्धनाच्या कामात अधिक प्रभावी सहभाग नोंदवणार आहेत.
गोवा राज्यात मराठी साहित्याची मुळे अधिक बळकट करताना नव्या पिढीपर्यंत साहित्य पोहोचवण्यासाठी नव्या रचनात्मक उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी निवडीनंतर केले.