नाशिक | १२.११ | गुरुदत्त वाकदेकर
(Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आज राज्यातील विविध महानगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. नाशिक महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज मंगळवारी ता. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिकमधील कालिदास कला मंदिर येथे पार पडली. या सोडतीला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक डॉ. मनिषा खत्री तसेच उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते. या प्रक्रियेत पारदर्शक ड्रमचा वापर करण्यात आला आणि लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या पारदर्शक आणि न्याय्य सोडतीदरम्यान नाशिक महानगरपालिकेतील एकूण ३१ प्रभागांपैकी काही प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
(Election) पंचवटी विभागात — प्रभाग क्र. १ मध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, ओबीसी (महिला) आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. २ मध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. ३ मध्ये ओबीसी (महिला), सर्वसाधारण (महिला) आणि दोन सर्वसाधारण; प्रभाग क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. ५ मध्ये ओबीसी, दोन सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. ६ मध्ये अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी, सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाले आहे. पश्चिम विभागात — प्रभाग क्र. ७, १२ आणि १३ मध्ये अनुक्रमे ओबीसी, सर्वसाधारण (महिला), अनुसूचित जाती आणि ओबीसी (महिला) असे आरक्षण लागू झाले आहे.
(Election) सातपूर विभागात — प्रभाग क्र. ८ ते ११ आणि २६ या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण या प्रवर्गांनुसार आरक्षण ठरले आहे. पूर्व विभागातील प्रभाग क्र. १४, १५, १६, २३ आणि ३० मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. नाशिकरोड विभागात — प्रभाग क्र. १७ ते २२ दरम्यान विविध ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सिडको विभागात — प्रभाग क्र. २४ ते ३१ मध्ये ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या प्रवर्गांनुसार प्रभाग राखीव ठरले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आरक्षण प्रक्रियेचे टप्पे पुढीलप्रमाणे पार पडतील — ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरक्षित जागांची संख्या निश्चित करून ती आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आली. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली, तर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोडत काढून निकाल आयोगास सादर करण्यात आला. १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध होऊन हरकती व सूचना मागविण्यात येतील. २४ नोव्हेंबर हा हरकती व सूचनांचा अंतिम दिनांक असेल. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत मनपा आयुक्त प्राप्त हरकतींवर विचार करून निर्णय घेतील, तर २ डिसेंबर २०२५ रोजी आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.
या सोडतीनंतर संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रभागांत आरक्षणामुळे निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महिला आरक्षणामुळे शहरात नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळणार असून, येणारी निवडणूक नाशिकच्या राजकीय भवितव्यास निर्णायक ठरण्याची शक्यता नागरिक आणि राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
