अहमदनगर | २५.१ | आबिदखान दुलेखान
(Education) महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई आणि कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणाऱ्या २०२५-२६ च्या स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत अहिल्यानगर येथील प्रगत कला महाविद्यालय येथील मान्यवर प्राध्यापकांनी राष्ट्रीय पाठशाळा स्कूल, अहिल्यानगर येथे शैक्षणिक भेट देत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कला शिक्षण व कलाक्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले.
(Education) या मार्गदर्शन सत्रात प्रगत कला महाविद्यालयाचे प्रा. नुरील भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ए.टी.डी., इंटेरियर डिझाईन, फाईन आर्ट, शिल्पकला, चित्रकला, पोर्ट्रेट आर्ट अशा विविध कला प्रकारांविषयी सविस्तर माहिती दिली. कला ही केवळ उपजीविकेचे साधन नसून, ती माणसाला मानसिक समाधान, आनंद आणि सुसंस्कृत जीवन जगण्याची प्रेरणा देते, असे त्यांनी सांगितले.
कलेचा जीवनाशी असलेला घट्ट संबंध स्पष्ट करताना प्रा. नुरील भोसले यांनी शाळेचे कलाशिक्षक कविराज बोटे यांचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर मांडले.
(Education) कविराज बोटे सर हे उत्कृष्ट ड्रॉइंग शिक्षक असून ते शिल्पकला, चित्रकला आणि पोर्ट्रेट आर्टमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. शाळेतील जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच त्यांनी कलेची ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेबाहेरही ते कला जोपासण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात कला आणि मूल्यांचा सुंदर समन्वय दिसून येतो. तुम्हाला खरोखरच एक आदर्श कलाशिक्षक लाभले आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यानंतर विद्यार्थ्यांना फाईन आर्टिस्ट, कमर्शियल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर, इंटेरियर डिझायनर, आर्ट टीचर, इलस्ट्रेटर, अॅनिमेशन, आर्ट डायरेक्शन, आर्ट कंझर्वेशन अशा विविध क्षेत्रांतील करिअर संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कला क्षेत्रातही उज्ज्वल आणि स्थिर भविष्य घडवता येते, हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला.
तसेच कलाशिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या नामांकित संस्थांबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई, सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर तसेच महाराष्ट्रातील विविध शासकीय व अनुदानित कला महाविद्यालयांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि भविष्यातील संधी याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी कला शिक्षण व करिअरविषयक उपयुक्त वेबसाईट लिंक्सही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. मोबाईलद्वारे घरबसल्या कला शिक्षण, अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळू शकते, असे प्रा. भोसले यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने गणेश काथवते यांनी प्रा. नुरील भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी प्रा. चंद्रकांत देठे, कलाशिक्षक कविराज बोटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी व शिस्तबद्ध सूत्रसंचालन स्वप्निल व्यवहारे यांनी केले.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना कला शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी आणि जीवनातील कलेचे स्थान याबाबत स्पष्ट दिशा मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन
