पुणे | २७.२ | रयत समाचार
(Education) आकुर्डी येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरवदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थापक सचिव डॉ. गोविंदराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय परिसरामध्ये लेझीम पथकाच्या दिमाखदार तालावर ग्रंथदिंडी काढण्यात आली.
(Education) यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात मराठी साहित्याची पुस्तके, घोषवाक्ये आणि मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणारे फलक दिसून येत होते. संपूर्ण परिसरात मराठीच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. शाळेमध्ये मराठी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. अनेक कवी, लेखक आणि साहित्यिकांची पुस्तके मांडण्यात आली होती.
(Education) कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना उभे यांनी तर निवेदन प्रतिमा काळे यांनी केले. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याविषयी भाषणातून माहिती दिली. तसेच मराठी भाषेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. मानसी मेटांगे या विद्यार्थिनीने मराठी भाषेवर आधारित प्रश्न विचारून स्पर्धेत रंगत आणली.
शिक्षक कैलास कोशिरे यांनी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक लिखित ‘माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का’ हे लोकप्रिय गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रतिमा काळे यांनी शिक्षक मनोगतात कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यकार्याचा आढावा घेतला तसेच स्वरचित ‘भाषा मराठी साजिरी’ ही कविता सादर केली.
इयत्ता सातवीमधील विद्यार्थी श्रीयश गायकवाड याने मराठी भाषेबद्दल प्रभावी भाषण केले, तर आर्यन कसबे या विद्यार्थ्याने ‘अरे खोप्यामध्ये खोपा’ ही कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. संगीत शिक्षक प्रकाश कोळप यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत चव्हाण, चतुर आखाडे, अविनाश आखाडे, सविता पाटील, नयना पाटील आणि सुकन्या जाधव यांनी परिश्रमपूर्वक केले. मराठी भाषेचा अभिमान जागवणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेमाची बीजे रुजवणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
हे ही वाचा : महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
